मावळ / क्रांतिकुमार कडुलकर : नागपूर येथे सुरु असलेल्या अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावावर विचार व्यक्त करताना मावळचे आमदार सुनिल शेळके तालुक्यातील गुन्हेगारी, अवैध धंदे आणि विकासकामांवरील स्थगिती अशा विविध मुद्द्यांवर बोलताना आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. धरणग्रस्तांचे पुनर्वसन, औद्योगिक क्षेत्रातील संपादित जमिनीचा शेतकऱ्यांना मोबदला, तरुणांना रोजगार, ग्रामीण भागातील रस्ते, आरोग्य सुविधा, नागरिकांची सुरक्षा, कायदा सुव्यवस्था अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी आवाज उठविला.
आमदार शेळके म्हणाले, मावळ तालुक्याची पर्यटन, औद्योगिक, शैक्षणिक नगरी म्हणून ओळख आहे. सेकंड होम म्हणून या भागाला पसंती दिली जाते. परंतु या भागात येणाऱ्या पर्यटकांना नागरिकांना सुरक्षित वाटले पाहिजे. वाहतूक कोंडीची समस्या सुटली पाहिजे यासाठी पुलांची मागणी केली. परंतु ही कामे थांबवण्याचे काम या सरकारने केले. युवक व्यसनाधीन होत आहेत. अंमली पदार्थ, गांजा, हातभट्टीची दारू गावागावात मिळते. सातत्याने पोलीस यंत्रणेला सांगून देखील ग्रामीण भागातील अवैध धंदे सुरू राहत असतील तर याला पाठीशी कोण घालतंय, यांच्यावर कोण मेहरबान आहे. आणि 15 ते 18 वर्षांचे युवक व्यसनाधीन होत असतील तर याला कोण जबाबदार आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. त्यांना सुरक्षा द्यायची असेल तर पहिले अवैध धंदे बंद केले पाहिजेत. कोयता गॅंग, भुरट्या गँग या दहशत निर्माण करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. लोकप्रतिनिधींची चौकशी करण्यापेक्षा उद्याची पिढी बरबाद होतेय याकडे सरकारने लक्ष द्यावे. नागरिकांना सुरक्षा दिली पाहिजे तिथे पण लक्ष द्यावे. स्वरा चांदेकरच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. परंतु अद्याप मदत केली नाही.याकडे देखील त्यांनी लक्ष वेधले.
मतदारसंघासाठी निधी मिळेल या अपेक्षेने आम्ही अधिवेशनाकडे पाहत होतो. परंतु निधी काही मिळाला नाही. नका देऊ आमची हरकत नाही. पण आमच्या महाविकास आघाडी सरकारने जो ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी निधी दिला. त्यावरील तरी स्थगिती उठवा. रस्त्यांची कामे सुरू करा. चार-पाच महिन्यानंतर पावसाळा येईल त्याआधी जर रस्त्यांची कामे झाली नाही तर ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाल्याशिवाय राहणार नाही.कोणाचा अपघात झाला अथवा मृत्यू झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी या सत्ताधाऱ्यांनी घेतली पाहिजे. जाणीवपूर्वक निधी अडवण्याचे काम केले जात आहे.पोटात एक आणि ओठात एक ही भावना या सरकारची आहे.पुलांची कामे बंद, रुग्णालयांची कामे बंद, पर्यटनाला चालना म्हणून विविध कामे सुरू केली ती ही बंद आहेत. विकास कामांमध्ये तरी राजकारण करू नका ही अपेक्षा या सरकारकडून व्यक्त करतो. लोकप्रतिनिधी म्हणून येथे आल्यानंतर आम्हाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. बाकीच्या राजकारणाशी आम्हाला देणेघेणे नाही. परंतु आमचा निधी तुम्ही थांबवला,आमच्याशी गद्दारी केली. परंतु आमच्या जनतेशी तरी गद्दारी करु नका, असे सांगत सत्ताधारी सरकारच्या भूमिकेवर रोष व्यक्त केला.
मागील अडीच वर्षात मूलभूत सुविधा व प्रश्नांकरता महाविकास आघाडीने बाराशे कोटी रुपये दिले. आणि सध्याचे सत्ताधारी सरकार जर खरोखरच जनतेचे सरकार, सर्वसामान्यांचे सरकार असेल तर त्यांनी आगामी काळात किमान 600 कोटी रुपये तरी निधी द्यावा. मावळच्या जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानेल. व माझ्या मतदारसंघातील सर्वसामान्य न्याय मिळेल हीच अपेक्षा व्यक्त करतो. असे सांगत विकासाबद्दलची तळमळ त्यांनी व्यक्त केली.
