Thursday, April 25, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडरास्त भाव दुकानांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करा; नवीन दुकानांचा जाहीरनामा रद्द करण्याची...

रास्त भाव दुकानांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करा; नवीन दुकानांचा जाहीरनामा रद्द करण्याची मागणी

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व रास्त भाव दुकानांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात यावा. नवीन दुकानांचा जाहीरनामा न करता सद्यस्थितीत दुकानदारांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निवारण करावे, अशी मागणी ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशनच्या वतीने पुणे विभागाचे पुरवठा उपायुक्त तथा राज्य समन्वय (नोडल) अधिकारी त्रिभुवन कुलकर्णी, जिल्ह्याच्या डीएसओ सुरेख माने, परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे आणि भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशनने निवेदनात म्हटले आहे की, पुणे विभागाच्या अन्नधान्य वितरण कार्यक्षेत्रामध्ये एकूण ११ परिमंडळ येतात. कार्यालयांतर्गत मंजूर असलेल्या अंत्योदय ८२५५ शिधापत्रिका, प्राधान्य कुटुंब १३,१४,२८३ लाभार्थी या इष्टांक मर्यादेत अंतर्भूत होतात. सद्यस्थितीत ६९८ रास्त भाव दुकाने कार्यरत आहेत. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब मिळून एकूण ३,१९,१६२ शिधापत्रिका तर ११,९८,०२१ इतके लाभार्थी आहेत. जवळपास या सर्व लाभार्थ्यांची आधार नोंदणी झालेली आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये काही कारणास्तव दुकाने बंद झाली आहेत. त्या ठिकाणी प्रशासनाकडून नवीन दुकानांचा प्रस्ताव अर्ज टाकण्यात आलेला आहे. परंतु, सद्यस्थितीत स्वस्त धान्य दुकानदारांकडे अन्नसुरक्षा व अंत्योदय कार्डचे ५० ते ५०० पर्यंतच लाभार्थी आहेत. कमी लाभार्थी संख्येमुळे दुकानदारांची उपजीविका भागेल एवढेही उत्पन्न दुकानातुन मिळत नाही. पुरवठा विभागाने प्रति दुकानात किमान चार ते सहा हजार लाभार्थी संख्येचा समावेश करावा. त्यामुळे दुकानदार आपली दुकाने बंद करणार नाहीत. शासनाकडून धान्य पुरवठा वेळेत मिळत नाही, तो वेळेत देण्याची तजवीज करावी. दुकानदारांचे मागील काही महिन्यांचे कमिशन बाकी आहे. यापुढे दुकानदारांचे कमिशन महिन्याच्या १० तारखेच्या आत खात्यावर जमा करावे. या आधीही संघनेच्या वतीने कमिशन वाढ आणि नियमित कमिशन मिळावे यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्यावर ठोस कारवाई न होता, सर्व कार्ड ऑनलाइन झालेले आहेत. वरिष्ठांना कळवतो, एवढे सांगून आमची बोळवण केली जाते. त्यावर तत्काळ अंलबजावणी व्हावी, असे या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशनचे अध्यक्ष डोळसे पाटील, खजिनदार विजय आर गुप्ता, पुणे विभागीय अध्यक्ष शहाजी लोखंडे, सचिव मोहनलाल चौधरी यांच्या सह्या आहेत.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय