(पुणे):– महाराष्ट्रात काँग्रेस नेते अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांच्या सह अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यावेळी कोरोनावर त्यांनी यशस्वी रित्या मात केली होती.
पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष तसेच आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. आमदार लांडगे यांना त्रास होऊ लागल्याने त्यांच्या घशातील द्रवाच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यांचे रिपोर्ट आज (दि.29) पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यावर चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मोठ्या नेत्यांशी आला होता संपर्क
दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, आदींसह उच्चपदस्थ अधिकारी यांची पुण्यात बैठक झाली होती. या बैठकीला जिल्ह्यातील आमदारांसह महेश लांडगे सुद्धा उपस्थित होते. तसेच माजी खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप आणि महापालिकेतील प्रमुख पदाधिकारी यांच्या संपर्कात आमदार लांडगे आले आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शहर दौ-यावर आले असताना लांडगे त्यांच्यासोबत होते. कोविड समर्पित वायसीएम रुग्णालयाला त्यांनी भेट दिली होती. चार दिवसांपूर्वी महापालिकेतील अधिका-यांशी देखील चर्चा केली होती. आयुक्तांच्या अॅन्टी चेंबरमध्ये बैठक झाली होती. त्यात त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची आता तपासणी केली जाणार आहे.