सिंधुदुर्ग : अखिल भारतीय संयुक्त कामगार कृती समितीने केलेल्या आवाहनानुसार केंद्र सरकारच्या शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी, योजना कर्मचारी, शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांच्या कामगार व खाजगीकरणाच्या धोरणांविरोधात दि. 26 मार्च रोजी भारत बंद ची हाक दिली आहे. या भारत बंद आंदोलनात सिटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन देखील सहभागी होणार असल्याची माहिती अध्यक्षा अर्चना धुरी, सचिव विजयाराणी पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ने 2021 हे वर्ष आंतरराष्ट्रीय हेल्थ अँड केअर वर्कर्स वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार भारत सरकारने योजना कर्मचाऱ्यांमध्ये आशा-गटप्रवर्तक सहित इतर सर्व योजना कर्मचाऱ्यांना कामगारांचा विशेष दर्जा देऊन, त्यांना किमान वेतन लागू करावे, तसेच PF व इतर सामाजिक सुरक्षा याबाबत ठोस पावले उचलून सर्व महिला कर्मचाऱ्यांचे कल्याण करावे. व त्यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याचा सरकारने गौरव करून एक नवीन आदर्श जगासमोर ठेवावा, अशी अपेक्षा असताना सदर मोदी सरकार सर्व महिला कामगारांची, इतर कामगार, कर्मचारी, शेतकरी, शेतमजूरांच्या सहित पिळवणूक करीत आहेत. सदर पिळवणुकीच्या विरोधात तसेच शेतकरी विरोधी तीन काळे कायदे व कामगार विरोधी चार संहिता रद्द करावे या प्रमुख मागण्यांंना घेऊन भारत बंद ची हाक दिली आहे.
आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तकांनी जनसामान्यांचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात दि. 26 मार्च रोजीच्या भारत बंद मध्ये आपला सहभाग नोंदवून हे आंदोलन यशस्वी करणार असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.