मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निवेदन
नंदुरबार : पेसा क्षेत्रातील अनुसुचित जमातीच्या शिक्षक पदांचा अनुशेष असलेल्या सर्व रिक्त पदांच्या जागा पवित्र पोर्टलला उपलब्ध करून द्या, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, कपिल पावरा, रमेश पावरा, अमरसिंग पाडवी, अरूण वळवी, मंगला पावरा, पिंगला रावताळे आदि आदिवासी बांधव उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्याच्या पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या शिक्षकांची सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत. पवित्र पोर्टल शिक्षक भरती २०१७ – स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, महानगरपालिका, खाजगी संस्था नियुक्ती आदेश देऊन राहिलेल्या अनुसूचित जमाती (पेसा) संवर्गाच्या सर्व रिक्त जागा पवित्र पोर्टल शिक्षक भरती २०२२-२३ अनुसूचित जमाती (पेसा ) साठी उपलब्ध करावेत. बिंदूनामावली २०२२ नुसार अनुसूचित जमाती ( सर्वसाधारण ) शिक्षक पदाचे रिक्त जागा व अनुसूचित जमाती (पेसा) च्या सर्व रिक्त जागांचा अनुशेष पवित्र पोर्टलमध्ये उपलब्ध करावेत .अवैध जात प्रमाणपत्र असलेल्या शिक्षकांच्या अधिसंख्य झालेले शिक्षकांच्या जागा पवित्र पोर्टलसाठी उपलब्ध करावेत. वर्षानुवर्षे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी संस्था मधील अनुसूचित जमाती प्रवर्गाचे शिक्षकांचे रिक्त पदाचे अनुशेष असलेले सर्व रिक्त पदे पवित्र पोर्टलला उपलब्ध करून द्यावेत.
राज्यात बऱ्याच खाजगी संस्थेतील शाळेत आदिवासींचे रिक्त पदे वर्षानुवर्षे भरली जात नाही. अशी हजारो रिक्त पदांच्या अनुशेष माहिती घेऊन आदिवासींचे रिक्त पदे भरण्यात यावीत. अनुसूचित क्षेत्रातील शिक्षक भरती १००% स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारामधून भरण्यात याव्यात. अनुसूचित जमातीच्या उमेदवारांबाबतीत अनुसूचित जमातीच्या विशेष भरतीच्या धर्तीवर अर्ज सादर करतांना जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक करावे. कोणत्याही अनुसूचित जमातीच्या उमेदवाराला जात वैधता प्रमाणापत्र असल्याशिवाय नियुक्ती देऊ नये. या बाबींचा विचार करून आदिवासींची रिक्त असलेली सर्व पदे पवित्र पोर्टला उपलब्ध करून द्यावेत.
महामहिम राज्यपाल यांच्या अधिसुचनेनुसार नंदुरबार जिल्ह्यातील 5 वी अनुसूची आणि पेसा कायद्याच्या अधीन राहून पदभरती करण्यात यावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे बेरोजगार आदिवासी युवकांकडून संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.