Friday, March 29, 2024
HomeNewsमहावितरण मधील कंत्राटी कामगारांचे उपोषण

महावितरण मधील कंत्राटी कामगारांचे उपोषण

पुणे / प्रा.सतिश शिंदे : राज्य सरकार, उर्जा मंत्री, कंपनी प्रशासन, यांच्या दुर्लक्ष्या मुळे राज्यभरात ऊर्जा खात्यातील वीज कंत्राटी कामगार त्रस्त आहेत. शासनाचे दुर्लक्ष त्यामुळे प्रशासन मस्त अशी अवस्था तिन्ही वीज कंपन्यात झाली आहे. कंत्राटदार देखील मनमानी कारभार करू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडून न्यायमिळवून देण्यासाठी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) च्या वतीने रिजनल डायरेक्टर महावितरण कंपनीच्या कार्यालय समोर, सेनापती बापट रोड पुणे येथे लाक्षणिक उपोषण केले.

वीज मंडळ शिकाऊ उमेदवार संस्था सातारा या कंत्राटदाराला महावितरण चे सातारा जिल्ह्यातील कंत्राट मिळाले असता त्यांनी शेकडो वीज कंत्राटी कामगारांच्या पगारातून दरमहा ११०० रुपये प्रमाणे करोडो रुपये परस्पर या कामगारांच्या बँक खात्यातून अनधिकृत पणे इन्शुरन्सच्या नावाखाली काढून घेतले आहे. ही बाब ०६ कामगारांनी महावितरण सातारा प्रशासन व सातारा पोलीस यांच्या निदर्शनास आणून दिली असता या संस्थेवर सातारा पोलिसात फौजदारी गुन्हा दाखल होऊन सदर कंत्राटदाराला अटक झाली.

तक्रार केली या सूडभावनेने व आकसापोटी त्याने ०१ जानेवारी २०२३ पासून ०६ वीज कंत्राटी कामगार अनधिकृतपणे कामावर रुजू करून घेतले नाही. सदर कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल झाल्या बद्दलची सर्व माहिती महावितरण सातारा प्रशासनाला असून सुद्धा पुन्हा त्यांच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्याच संस्थेला महावितरण सातारा प्रशासनाने पुन्हा टेंडर देऊ केले. या बाबत संघटनेने प्रशासन व सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय सातारा येथेही तक्रार केली असून सदर कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्या ऐवजी याच भ्रष्ट कंत्राटदाराला टेंडर कसे दिले जाते ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

सहाय्यक कामगार आयुक्त सातारा व अधीक्षक अभियंता सातारा यांनी आदेश देऊनही या ०६ अन्याग्रस्त कामगारांना कामावर घेतले जात नाही, उलट भ्रष्ट कंत्राटदारालाच महावितरणचे काही प्रशासकीय अधिकारी अभय देताना दिसत आहे. या प्रकरणात महावितरणचे अधिकारी विषय न सोडवता मस्त व कामगार मात्र त्रस्त झाले असून यांना कामावर घेऊन सदर कंत्राटदार व दोषी अधिकारी यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा इशारा संघटनेने दिला होता. संघटनेचे उपसरचिटणीस राहुल बोडके, सातारा येथील पीडित कामगार व अन्य पदाधिकारी उपोषणास बसले होते.

यावेळी कामगार उपायुक्त अभय गीते यांच्या दालनात त्रिपक्षीय बैठक आयोजित करून या विषयावर वरिष्ठ पातळीवर त्रिपक्षीय बैठक घेवून कामगारांना न्याय दिला जाईल, तसेच दोषी संस्थावर कारवाई केली जाईल, त्यामुळे उपोषण थांबवण्यासाठी आवाहन केले याला सकारात्मक प्रतिसाद देवुन उपोषण स्थगित केले आहे.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, संघटन मंत्री ऊमेश आणेराव, भामसंघ अध्यक्ष अर्जुन चव्हाण, सातारा प्रतिनिधी दिलीप शिंदे, निखिल टेकवडे व महावितरण प्रशासनाच्या वतीने उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीश काटकर, उपस्थित होते. कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबतीत शासनाने दखल घेऊन कार्यवाही करावी अन्यथा महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व जिल्हांमध्ये उपोषण करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी झालेल्या जाहीर सभेत बोलताना दिला आहे.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय