Thursday, December 26, 2024
Homeग्रामीणकोल्हापूर : शैक्षणिक वर्ष फिजिकली व प्रॅक्टिकली पूर्ण करण्याकरिता नियोजन करा -...

कोल्हापूर : शैक्षणिक वर्ष फिजिकली व प्रॅक्टिकली पूर्ण करण्याकरिता नियोजन करा – नागरी कृती समितीची मागणी

शैक्षणिक वर्ष १५ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू करावे

कोल्हापूर दि. १ जून : देशातील व राज्यातील करोनाची परिस्थिती, होणारे लसीकरण याचा विचार करून यावर्षी शैक्षणिक वर्ष १५ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू करावे अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने माध्यमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी झालेल्या चर्चेत या निवेदनाच्या आधारे पालक विद्यार्थ्यांना दिलासा दयक योग्य ते आदेश पुढील चार दिवसात काढले जाईल, असे आश्वासन दिले. तसेच हे निवेदन राज्य सरकारच्या शिक्षण विभागाला पाठवले जाईल असे लोहार म्हणाले.

निवेदनात म्हटले आहे की, देशामध्ये तसेच महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सद्यस्थिती अतिशय भयानक असल्याने राज्यातील २१ जिल्हे रेड झोन मध्ये गणले जात आहेत. राज्‍याचे सन २१- २२ चे नियमित शैक्षणिक वर्ष दिनांक १४ जून २०२१ पासून सुरू होत आहे. अद्याप राज्यामध्ये पुस्तकांची छपाई पूर्ण झाली नसल्याचे समजते. त्याच बरोबर तज्ञ डॉक्टरांच्या मते कोरोना प्रादुर्भावाची तिसरी लाट येणार असल्याचे जाहीर केले जात आहे. या लाटेचा परिणाम लहान मुलांच्यात प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, अशा परिस्थितीत शैक्षणिक वर्ष सुरू करणे जोखमीचे ठरू शकते. 

शैक्षणिक वर्ष १५० दिवसांचे असावे. त्यामध्ये दोन परीक्षा घ्याव्यात. या नियोजनासाठी लागणाऱ्या अर्ध्या अभ्यासक्रमाची पुस्तके छपाई व्हावीत. त्यामुळे छपाई खर्च व वेळ वाचेल तसेच सामान्य पालकांची आर्थिक पिळवणूक थांबेल. तसेच शासन प्रत्यक्ष शैक्षणिक वर्ष जाहीर करत नाही तोपर्यंत कोणत्याही शाळेला विद्यार्थ्यांकडून प्रवेश अथवा फी संदर्भात प्रक्रिया न राबवण्याच्या सक्त सूचना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मागील वर्षीचा अनुभव घेता ऑनलाइन शिक्षण पद्धती शंभर टक्के यशस्वी होत नाही असे पालकांचे मत आहे व तसा अनुभव मागील शैक्षणिक वर्षात  आलेला आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याच्या नावाखाली पालक, विद्यार्थ्यांना (विशेषतः खाजगी व इंग्लिश माध्यमांच्या शाळा ) आर्थिक व मानसिक त्रास झालेला आहे व नवीन वर्षात होऊ शकतो. त्यामुळे सर्व शिक्षण क्षेत्रातील घटकांना शासनाच्‍या वतीने योग्य त्या सूचना देण्याची मागणी करण्यात आली आहे.

त्याच बरोबर कुठल्याही प्रकारची शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके, लेक्चर, ऑनलाइन उपलब्धतेबाबत प्रक्रिया राबवणे शक्य नाही. कारण महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक परिस्थितीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ते शक्य नाही याचा अनुभव मागील शैक्षणिक वर्षात ऑनलाइन अभ्यासक्रमात शासनाला आला आहे. त्यामुळे शासनाने योग्य पद्धतीने नियोजन करून सन २१- २२ हे शैक्षणिक वर्ष फिजिकली तसेच प्रॅक्टिकली पूर्ण करण्याकरिता योग्य ते नियोजन करावे. 

मागील वर्षा सारखे ढिसाळ नियोजन करून पालकांची व विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती बिघडू नये याची पुरेपूर जबाबदारी स्विकारावी व त्याबरोबर सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न व्हावेत व त्या पद्धतीने शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी योग्य ते नियोजन करून ते परिपूर्ण जाहीर करावे, त्यामुळे पालकांची शैक्षणिक फी, शालेय साहित्य व इतर शालेय खर्चांसाठी होणारी आर्थिक पिळवणूक होणार नाही असेही म्हटले आहे.

निवेदन देतेवेळी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे प्रमोद पुंगावकर, अशोक पोवार, विनेद डुणूगं, रमेश मोरे, चंद्रकांत पाटील, अंजू देसाई, भाऊ घोडके हे उपस्थित होते.


संबंधित लेख

लोकप्रिय