पिंपरी चिंचवड : एका प्रसिद्ध दैनिकाच्या पत्रकाराने ‘स्पर्श’ हॉस्पिटलच्या डॉक्टरांना पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी एका पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुहास संभाजी भाकरे (वय – ४३ वर्षे) असे पत्रकाराचे नाव असून डॉ. अमोल अशोक होळकुंदे रा. स्पर्श हॉस्पिटल, सोमाटणे फाटा, मावळ यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
डॉ. होळकुंदे हे ‘फॉर्च्युन हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड, स्पर्श हॉस्पिटल’ या संस्थेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्यांच्या हॉस्पिटलला कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी अॅटोक्लस्टर चिंचवड येथे डेडीकेटेड कोविड सेंटर चालविण्यास दिले आहे.
पत्रकार भाकरे याने संस्थेचे डॉक्टर व संचालकांना पाच लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप डॉ. होळकुंदे यांनी केला आहे. खंडणी न देल्यास स्पर्शविरोधात बातम्या देऊन संस्थेचे कॉन्ट्रॅक्ट बंद पडण्याची धमकीही या पत्रकाराने दिली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दि. २७ नोव्हेंबर २०२० रोजी भाकरे याने संस्थेचे संचालक विनोद आडसकर यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअपद्वारे वकिलाचे नाव असलेल्या नोटीसीच्या ड्राफ्टवर ‘मी तुमच्या कोविड सेंटरविरोधात तक्रार करीत आहे. मी तुमची बिले अडकून ठेवीन. माझ्या मागणीचा विचार करा.’ असा धमकीवजा मेसेज पाठविला. तसाच मेसेज दि. ८ डिसेंबर २०२० लाही पाठविला. त्यानंतर दि. २३ फेब्रुवारी २०२१ ला भाकरे याने पाच लाखांची खंडणी मागितली असता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बाहेर संस्थेने भाकरे यास २ लाख रुपये रोख स्वरुपात दिले. बाकीचे ३ लाख रुपये स्पर्श संस्थेच्या खात्यावरून भाकरे याच्या भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या खात्यावर नेफ्टद्वारे पाठविले गेले. अशा प्रकारे पत्रकार भाकरे याने डॉ. होळकुंदे यांना वारंवार धमकावून ५ लाख रु.ची खंडणी घेतली आहे. या संबंधीचा पुढील तपास पिंपरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करीत आहेत.