Thursday, December 5, 2024
HomeNewsजनभूमी साहित्य , कविता : एकजुटीच्या जोरावर , कवी - अविनाश गवारी

जनभूमी साहित्य , कविता : एकजुटीच्या जोरावर , कवी – अविनाश गवारी

एकजुटीच्या जोरावर..

लाल बावटा घेऊन खांद्यावर आपण कायद्याच्या जोरावर,

रस्ता लढून आणलाय एकजुटीच्या जोरावर ..!

आपल्या वाडवडिलांनी,पायी प्रवास भोगला,

कोणी आजारी पडल्यावर,त्याला झोळीनं वाहिला.

हांडे घेऊन डोक्यावर चढले मायबाप डोंगर ,

रस्ता लढून आणलाय एकजुटीच्या जोरावर..!

शिक्षण,बाजार,मतदान,केलं डोंगर उतरून,

साऱ्या पिढ्यांनी पाहिलं , होतं लढ्याचं सपान.

नेते पुढाऱ्यांनी आजवर, ठेवलं आश्वासनांवर,

रस्ता लढून आणलाय एकजुटीच्या जोरावर..!

भ्रष्टाचारी प्रशासनानं, या लाचार व्यवस्थेनं,

फेल केले होते आपले, चाळीस वर्षांचे प्रयत्न.

संविधानाच्या जोरावर,आपल्या पाठपुराव्यांवर,

रस्ता लढून आणलाय एकजुटीच्या जोरावर..!

मार्ग दाऊन कायद्याचा, केला लढायचा निर्धार,

किसान सभेनं,लाल बावट्यानं दिली मोर्चाची ललकार.

विळा हातोड्याचा दणका,शासनाच्या छाताडावर,

रस्ता लढून आणलाय एकजुटीच्या जोरावर..!!!

पुन्हा एकीनं घेऊया ध्यास, करू गावाचा विकास,

पेसा कायदा,वन हक्क यांचा करून अभ्यास.

रोजगार,शिक्षण,आरोग्यावर लक्ष व्यसनमुक्तीवर,

रस्ता लढून आणलाय एकजुटीच्या जोरावर..!

लाल बावटा घेऊन खांद्यावर,आपण कायद्याच्या जोरावर

रस्ता लढून आणलाय संविधानाच्या जोरावर..!

रस्ता लढून आणलाय एकजुटीच्या जोरावर..!

कवी – अविनाश शांताराम गवारी

पत्ता – मु. आपटी पो. गंगापुर खु. ता. आंबेगाव जि. पुणे

मो. – 9423080828

Mail id – avinashgsfi@gmail.com

संबंधित लेख

लोकप्रिय