‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोअर्स मटेरियल खंड क्र. ३-१ जनता’ खंडाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-प्रकाशन
मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्तम कायदेपंडित होते. त्यांच्या विचाराने सर्वसामान्य लोकांच्या जीवनात परिवर्तन होण्यास मोठी मदत झाली. त्यांचे विचार समजून घेत असताना ते साहित्याच्या माध्यमातून नव्या पिढी समोर येणे तेवढेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने संपादित केलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोअर्स मटेरियल खंड क्र. 3-1 जनता या खंडाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
या प्रकाशन सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा समितीचे अध्यक्ष उदय सामंत, ऊर्जामंत्री तथा समितीचे सदस्य डॉ.नितीन राऊत, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री तथा समितीचे उपाध्यक्ष प्राजक्त तनपुरे, आमदार लहू कानडे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ.धनराज माने, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ.कृष्णा कांबळे, डॉ.भालचंद्र मुणगेकर आदी मान्यवर ऑनलाईन सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, हा ग्रंथ म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचं सोनं आहे. यामध्ये सर्व विषयांचा समावेश असून कुठलंही पान उघडले तर त्यांचे विचार यातून दिसतात. या विचाराचे प्रकाशन आज करत आहोत हे भाग्य आहे. यातूनच त्यांची विद्वत्ता दिसून येते. ती पुस्तकीय नव्हती तर अनुभवाची होती. अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धाडस, शौर्य बाबासाहेबांमध्ये होते. त्यांचे विचार आपण टप्प्याटप्प्याने खंड रुपात समजून घेत आहोत परंतु अखंड डॉ.बाबासाहेब आंबेडकर समजून घेतलं पाहिजे.
महाविकास आघाडी सरकार हे या विचाराचे सरकार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्य प्रकाशनासाठी निधीची कमतरता भासणार नाही. साहित्य प्रकाशनासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.