Sunday, December 22, 2024
Homeआंबेगावविभागीय वनहक्क समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

विभागीय वनहक्क समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

पुणे : पुणे जिल्हास्तरीय वनहक्क समितीने फेटाळलेले बहुतांश वैयक्तिक व सामूहिक वनहक्क दावे पुनर्विचारासाठी पुन्हा जिल्हास्तरीय समितीकडे पाठविणार. काल झालेल्या विभागीय वनहक्क समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय झाले.

काल विभागीय वनहक्क समितीची बैठक विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीला मुख्य वनसंरक्षण प्रवीण एन. आर., समितीचे सदस्य किरण लोहकरे, विद्या निगळे व जीवन शिंगाडे, समितीचे सदस्य सचिव प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड हे उपस्थित होते.

यावेळी आंबेगाव तालुक्यातील पिंपरी, आघाने, पिंपरगणे, तिरपाड गावातील १९ वैयक्तिक वनहक्क दावे व आहुपे गावाचा १ सामूहिक वनहक्क दावा की जे जिल्हा समितीने फेटाळले आहेत त्यावर विभागीय समितीकडे अपिलात गेलेल्या अपिलार्थींची काल विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी झाली. बहुतांश दाव्यांना पुरावा जोडलेला नाही असा आक्षेप वनविभागाकडून व जिल्हास्तरीय वनहक्क समितीकडून घेण्यात आला. परंतु हे वैयक्तिक वनहक्क दावेदार हे वर्षानुवर्षे या वनजमिनीवर शेती करत असून त्यांनी किमान दोन पुरावे जोडलेले आहेत तसेच या दाव्यांबाबत अनेक वस्तुनिष्ठ व कायदेशीर बाबींचा विचार व्हावा अशी भूमिका विभागीय समिती चे सदस्य किरण लोहकरे, विद्या निगळे व जीवन शिंगाडे यांनी घेतली. 

आहूपे गावचा सामूहिक वनहक्क दावा अभयारण्य क्षेत्रात येत असल्याने नामंजूर करण्यात येत आहे असे कारण जिल्हास्तरीय समितीकडून देण्यात आले होते. परंतु अभयारण्य क्षेत्रातही सामूहिक वनहक्क देण्याबाबतची कायदेशीर तरतूद समितीच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या निदर्शनास आणली व त्यांनीही ती मान्य केली. 

अपिल केलेल्या दावेदारांच्या बाबत सदस्यांनी घेतलेल्या भूमिकेचा विचार करत अध्यक्षांनी यातील बहुतांश दावे हे पुनर्विचारासाठी जिल्हास्तरीय वनहक्क समितीकडे पुन्हा पाठवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.

Mahaegs Maharashtra Recruitment
संबंधित लेख

लोकप्रिय