तिरुनेलवल्ली:तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे.मुसळधार पावसामुळे थुथुकुडी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १८ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खासगी महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
मिचॉन्ग चक्रीवादळानंतर तामिळनाडू अजूनही उध्वस्त होण्यापासून सावरत असताना आणखी एक आपत्ती आली. तामिळनाडूच्या दक्षिण भागात रविवारी सकाळी सुरू झालेला पाऊस सोमवारी सकाळपर्यंत सुरू होता.
थूथुकुडीत परिसराला पुराने वेढा घालत्याने नागरिकांचं घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. दुसरीकडे तुतीकोरीनमधील तिरुचेंदूरमध्ये रविवारी दुपारी दीड वाजेपर्यंत अवघ्या १५ तासांत ६० मिलिमीटर पाऊस झाला आहे.
या काळात तिरुनेलवेलीच्या पलायमकोट्टईमध्ये २६ सेमी पाणी साचलं आहे. मुसळधार पावसामुळे धरणांमधूनही पाणी सोडण्यात आले असून, त्यामुळे अनेक भागात रस्ते काठोकाठ भरले आहेत. यासंबंधीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
दरम्यान, पुढील २४ तासांत देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस (Heavy Rain) होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. आयएमडीने दक्षिणी तामिळनाडू, दक्षिण केरळ आणि लक्षद्वीपला अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होईल, असं सांगण्यात आलं आहे.