घोडेगाव : आदिवासी ठाकर समाजाच्या समकालीन परिस्थितीचा संशोधनात्मक अहवाल मांडणी व सुमारे ६० आदिवासी ठाकर समाजातील नागरिकांना जातीचे दाखले वाटप कार्यक्रम नुकताच घोडेगाव येथे पार पडला.
या कार्यक्रमाचे आयोजन किसान सभा आंबेगाव तालुका समिती व आदीम संस्कृती, अभ्यास संशोधन केंद्र यांनी एकत्रित केले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून घोडेगाव आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, आदीम संस्थेचे संशोधक किरण लोहकरे, किसान सभा पुणे जिल्हा समितीचे सचिव डॉ.अमोल वाघमारे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर हे होते.
यावेळी उपस्थितांमध्ये सामाजिक कार्यकर्ते उदयसिंह चौधरी, ट्रायबल फोरमचे डॉ.हरीश खामकर, आमोंडी गावचे सरपंच निलेश काळे, आदिवासी विकास विभागाचे कक्ष अधिकारी योगेश खंदारे उपस्थित होते.
आंबेगाव तालुक्यातील ठाकर समाजाचा, सामाजिक आर्थिक अभ्यास आदिम संस्थेच्या वतीने मागील पाच महिन्यापूर्वी करण्यात आला होता. या अभ्यासातून समोर आलेले प्रमुख निष्कर्ष व या अहवालाचे सादरीकरण आदीम संस्थेचे संशोधक किरण लोहकरे यांनी केले, तसेच ठाकर समाजाचे मूलभुत प्रश्नांचे आजचे स्वरूप त्यांनी समोर आणले.
यावेळी सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी अल्पवयीन विवाह, काही सामाजिक प्रश्न मांडून, कातकरी समाजाला आधारकार्ड सारखी ओळखपत्र मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे असे यावेळी नमूद केले.
आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यांनी ठाकर समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रकल्प कार्यालय पुढाकार घेईल असे आश्वासन देऊन, प्रकल्प कार्यालयाच्या शिक्षण विषयक योजनांची माहिती दिली. व कोणत्याही ठाकरवस्तीत शाळाबाह्य मुले राहणार नाहीत यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असेही नमूद केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर यांनी आदिवासी ठाकर समाजाचे प्रश्न, जे या अभ्यास अहवालातून पुढे आले आहेत ते सोडवण्यासाठी, सर्व ते सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. आदिवासी विकास विभाग, ठाकर समाजाला अधिकाधिक योजना मिळवून देण्यासाठी नक्की पुढाकार घेईल अशी अपेक्षा ही व्यक्त केली.
यावेळी सुमारे ६० आदिवासी ठाकर समाजातील व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते जातीचे दाखले वाटप केले गेले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश गाडेकर, प्रास्ताविक राजू घोडे व कार्यक्रमाचे आभार अविनाश गवारी यांनी मानले.
कार्यक्रमाचे संयोजन अर्जुन काळे, शशिकांत पारधी, शारदा केदारी, अशोक पेकारी, अनिल सुपे, दीपक वाळकोली, कमल बांबळे, अंकिता ढमढेरे यांनी केले.
ठाकर आदिवासी समाजाच्या अभ्यासातील काही ठळक निष्कर्ष :
आंबेगाव तालुक्यातील १३ ठाकरवस्तीतील सुमारे २९८ कुटुंबाचे सर्वेक्षण करून समोर आलेली तथ्ये
1. आंबेगाव तालुक्यातील ठाकर समाजात भूमिहीन कुटुंबांचे प्रमाण ४० % असून, अल्पभूधारकांचे प्रमाण ५० % आहे.
2. ठाकर समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी असून जवळपास कुटुंब प्रमुखांचा साक्षरता दर ५६ % असून तो राज्याच्या ६५ % पेक्षा ९ % ने कमी आहे.
3. ठाकर समाजाच्या कुटुंबांचे सरासरी मासिक उत्पन्न देशाच्या व राज्याच्या सरसरीपेक्षा तीन पटीने कमी म्हणजे २३३८ रुपये आहे.
4. आंबेगाव तालुक्यातील ठाकर समाजातील ९० % कुटुंबांना स्वतःच्या मालकीचे घर असले तरी त्यापैकी ५४ % कुटुंबांच्या घराखालच्या जमिनी ह्या इतर समाजातील लोकांच्या मालकीच्या आहेत. त्यामुळे अशा कुटुंबात घराच्या जमिनीवरून कायम चिंतेचे वातावरण असते.
5. रोजगार हमी योजना व आयुष्यमान भारत योजना याविषयी लोकांना माहिती नाही. जवळपास ८० % लोकांकडे जॉब कार्ड नाहीत.
6. सर्वच ठाकर वस्त्यांवर रॉकेलचा प्रश्न गंभीर असून ९१ % कुटुंबांनी ते मिळत नसल्याचे नमूद केले आहे.
7. जवळपास सर्वच ठाकर वस्त्यांवर पिण्याचे पाणी, रस्ते, दफनभूमी याविषयी लोकांना अनेक समस्या आहेत.