पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र ट्रस्ट चे सचिव दीपक गिरमे यांनी एक प्रसिध्दी पत्रक सादर केले आहे. त्या ते म्हणतात की, “ट्रस्टकडील निधी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करण्यासाठी वापरला जातो. त्याचा कोणालाही वैयक्तिक लाभ घेता येऊ शकत नाही !”.
अविनाश पाटील यांनी केवळ वैयक्तिक आकसाच्या पोटी ‘हमीद–मुक्ता दाभोलकर गटाने अंनिस महाराष्ट्र ट्रस्ट ताब्यात घेतला’ अशा स्वरूपाचे जे जाहीर आरोप केले आहेत, ते धादान्त खोटे आहेत, हे या पत्राच्या माध्यमातून आम्ही जाहीर करू इच्छितो. हमीद आणि मुक्ता दाभोलकर हे या ट्रस्टचे ट्रस्टी नाहीत. त्यांनी, तसेच एकाही ट्रस्टीने आजअखेर एकदाही एक नवा पैसादेखील मानधन किंवा प्रवासखर्च किंवा अन्य कारणाने घेतलेला नाही, असेही पत्रकात म्हटले आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये दोन गटात मोठा तणाव, हमीद-मुक्ता यांच्यावर गंभीर आरोप
सविस्तर निवेदन खालीलप्रमाणे :
‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र’, ही नोंदणीकृत न्यासाच्या स्वरूपातील कायदेशीर व आर्थिक रचना डॉ नरेंद्र दाभोलकर यांनी सुमारे तीस वर्षांपूर्वी स्थापन केली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य ह्या ट्रस्टमार्फत चालते. डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हयातीत आणि त्यानंतर देखील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व आर्थिक व्यवहार हे सदर ट्रस्टच्या विश्वस्त मंडळामार्फत केले जातात. या ट्रस्टच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत प्रतापराव पवार हे ह्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.
जेष्ठ शिक्षणतज्ञ राम ताकवले हे देखील सदर ट्रस्टचे सुरुवातीपासून ते आज अखेरपर्यंतचे विश्वस्त आहेत. निळू फुले, राजा पाटील, सदाशिव अमरापूरकर, दादासाहेब नाईकनवरे, अनंत लिमये, डॉक्टर दाभोलकरांचे अगदी सुरुवातीपासुनचे सहकारी सुकुमार मंडपे तसेच डॉ नरेंद्र दाभोलकर ह्यांच्या निघृण खुनानंतर विश्वस्त मंडळाच्या विनंतीवरून, जबाबदारी पार पडण्याच्या भूमिकेतून विश्वस्त झालेल्या शैला दाभोलकर हे या ट्रस्टचे काही आजी माजी विश्वस्त आणि पदाधिकारी आहेत.ट्रस्टमधील सर्व निर्णय हे साधक बाधक चर्चेनंतर सहमतीने घेतले जातात. २०१३ साली सदर ट्रस्टचे ट्रस्टी झालेल्या श्री अविनाश पाटील यांना त्यांची अक्षमता आणि ट्रस्टविरोधी कारवाया यामुळे या ट्रस्टच्या विश्वस्तपदावरून सर्वानुमताने गेल्या वर्षीच काढून टाकलेले आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील वाद चव्हाट्यावर, वाचा अविनाश पाटील यांचे संपुर्ण पत्र !
अविनाश पाटील यांनी विवेक जागर नावाचा स्वतंत्र ट्रस्ट स्थापन केल्यानंतर, त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे आमचे अधिकृत नाव वापरू नये याची त्यांना वेळोवेळी समज दिलेली आहे. तसेच अविनाश पाटील यांचा आमच्याशी कोणताही कायदेशीर अथवा आर्थिक संबंध नाही हे लोकांना देखील अवगत करून दिलेले आहे.
ह्या पार्श्वभूमीवर अविनाश पाटील यांनी केवळ वैयक्तिक आकसाच्या पोटी ‘हमीद -मुक्ता दाभोलकर गटाने अनिस महाराष्ट्र ट्रस्ट ताब्यात घेतला’ अशा स्वरूपाचे जे जाहीर आरोप केले आहेत ते धादांत खोटे आहेत, हे या पत्राच्या माध्यमातून आम्ही जाहीर करू इच्छितो. हमीद आणि मुक्ता दाभोलकर हे या ट्रस्टचे ट्रस्टी नाहीत. त्यांनी तसेच एकाही ट्रस्टीने आज अखेर एकदाही एक नवा पैसा देखील ट्रस्टकडून मानधन किंवा प्रवासखर्च किंवा अन्य कारणाने घेतलेला नाही. उलट ट्रस्टसाठी अनेकवेळा पैसे जमा करून दिले आहेत. ट्रस्टचे सध्याचे साताऱ्यातील कार्यालय देखील दाभोलकर कुटुंबीयांनी मोफत वापरण्यास दिलेल्या जागेत चालते.
‘एसएफआय’ च्या वतीने महात्मा गांधी स्मृती दिनानिमित्त ‘स्वच्छता मोहीम’
ट्रस्टमार्फत चालवल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सांगली येथे कार्यालय आहे. येथूनच वार्तापत्र निघते. ही जागा सोडता ट्रस्टची कोणतीही स्थावर मालमत्ता नाही. त्यामुळे ट्रस्टच्या मालमत्तेवर कुणी ताबा घेतला हे अत्यंत खोडसाळ आणि असत्य आरोप आहेत हे आम्ही नमूद करू इच्छितो.
ट्रस्टकडे असलेले पैसे हे महाराष्ट्रील जनतेने अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करण्यासाठी विश्वासाने ह्या ट्रस्टला दिलेले आहेत. ट्रस्टचे विश्वस्त मंडळ अत्यंत जागरूकपणे, पूर्णपणे स्वयंसेवी पद्धतीने, सदर कामासाठी त्याचा विनिमय करण्याचे काम करते. त्याचे सर्व हिशोब हे वेळच्या वेळी धर्मदाय कार्यालयाला सादर केले जातात. ट्रस्टकडील निधी हा अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करण्यासाठी वापरला जातो आणि त्याचा कोणालाही वैयक्तिक लाभ घेता येवू शकत नाही हे आम्ही स्पष्ट करू इच्छितो.गेल्या वर्षात या मधून केलेल्या भरीव कामाचा सविस्तर अहवाल सोबत जोडला आहे.
गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ह्या ट्रस्टच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या कार्याचे अध्यक्ष हे मानदपद हे स्थापनेपासून मा. एन डी पाटील यांच्याकडे होते. त्यांच्या निधनाने रिक्त झालेले पद हे कार्यकर्त्यांशी संवाद करून, अंनिस महाराष्ट्र ट्रस्टच्या संमतीने संघटनेच्या हितचिंतक आणि जेष्ठ कार्यकर्त्या सरोज पाटील यांना स्वीकारण्याची विनंती करण्यात आली
आणि त्यांनी देखील सर्व पार्श्वभूमी समजून घेवून ते स्वीकारले आहे. ही पूर्णपणे कायदेशीर बाब आहे. त्याच्याशी विवेक जागर ट्रस्टचे अविनाश पाटील यांचा काहीही संबंध नाही.
व्यक्तीकेन्द्री नेतृत्वाच्या पलीकडे जावून सामुहिक नेतृत्वाचा एक अभिनव प्रयोग गेले एक वर्ष ट्रस्ट महाराष्ट्र अनिसच्या कार्यकर्त्यांच्या सोबत राबवत आहे. या मध्ये राज्य पातळीवर कार्यध्यक्ष, प्रधान सचिव,राज्य सरचिटणीस ही सर्व पदे रद्द केली आहेत. त्यामुळे आजमितीस आमच्या समितीचा कोणीही कार्याध्यक्ष नाही. राज्यातील सहा विभागांचे प्रतिनिधत्व करणाऱ्या पंधरा समकक्ष कार्यकर्त्यांची राज्य कार्यकारी समिती ही यंत्रणा निर्माण करण्यात आलेली आहे.
ह्याला मदत आणि मार्गदर्शन करणारे पस्तीस जेष्ठ कार्यकर्त्यांचे सल्लागार मंडळ देखील स्थापन करण्यात आले आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाशी संबंधित बारा उपविभागांचे काम देखील अशाच पद्धतीने सहा लोकांच्या गटाच्या माध्यमातून नियोजन आणि कार्यवाही करून पार पाडले जात आहे. मेंढा (लेखा) गावाप्रमाणे सर्व सहमतीने व विकेंद्रित लोकशाही पद्धतीने सामाजिक काम चालवण्याची ही पद्धत आहे.
गेल्या वर्षभरात ह्या विकेंद्रित पद्धतीने सहमती निर्माण करण्याची प्रक्रिया घडवून आणून कार्यकर्ते आणि ट्रस्ट ह्यांच्या सहभागातून महाराष्ट्रात जोमाने काम चालू आहे. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र ह्या मुखपत्राचे कामदेखील ट्रस्ट आणि कार्यकर्ते यांच्या सहयोगाने चालू असून, त्याचे देखील प्रत्यक्षात पाच हजार आणि ऑनलाईन पन्नास हजार पेक्षा अधिक वाचक आहेत, असे निवेदन अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र ट्रस्टचे सचिव ह्या नात्याने अध्यक्ष प्रतापराव पवार आणि सर्व विद्यमान विश्वस्तांच्या मार्फत दीपक गिरमे ह्यांनी दिले आहे.