इचलकरंजी : ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी आमदार कालवश आप्पासाहेब उर्फ डॉ.सा.रे. पाटील यांनी सक्रिय राजकारण करत असतानाच सहकारातून समाजवादाची प्रस्थापना करण्याचा आणि त्या माध्यमातून विकास साधण्याचा जो प्रयत्न केला तो अतिशय महत्वाचा आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण, साने गुरुजी,एस. एम.जोशी आदींचा आदर्श ठेवत सा.रे. पाटील यांनी जे काम केले ते ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. त्याचबरोबर समाज परिवर्तनाच्या, लोकप्रबोधनाच्या चळवळींना त्यांनी सातत्याने सहकार्य करून प्रोत्साहन दिले. आजच्या अस्वस्थ वर्तमानात तो आदर्श आपण सर्वांनी जपण्याची व त्या पद्धतीने कृतिशील राहण्याची गरज आहे असे मत प्रबोधन वाचनालयाचे अध्यक्ष शशांक बावचकर यांनी व्यक्त केले.
ते समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने कालवश अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करतांना बोलत होते.
प्रारंभी प्रा.डॉ.एच.एम. पटेल यांच्या हस्ते सा.रे.पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वृत्तपत्र पत्रलेखक संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग पिसे, मनोहर कांबळे, यशवंत कांबळे, मुर्तजा पठाण ,विजयकुमार गायकवाड, अनिल नर्मदे, रुजाय डिसोजा, सुनील रावळ, सतीश पाटील, सौदामिनी कुलकर्णी, नंदा हालभावी, अश्विनी कोळी, विक्रम जाधव आदी उपस्थित होते.