पुणे : औंध येथील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेले डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह सुरू करण्याची मागणी एसएफआयने केली आहे.
कोविड महामारीच्या काळात बंद करण्यात आलेले मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी औंध, पुणे येथे असलेले डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह अद्याप विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आलेले नाही. वसतिगृहाची प्रशस्त इमारत असूनसुद्धा शेकडो गरजू विद्यार्थी या सुविधेपासून वंचित आहेत. विद्यार्थ्यांना निवासाची व्यवस्था नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वसतिगृह लवकरात लवकर सुरु करून विद्यार्थ्यांची हेळसांड थांबवावी अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) च्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) चे राज्यउपाध्यक्ष सोमनाथ निर्मळ, पुणे शहर निमंत्रक कमिटीचे अभिषेक शिंदे, भार्गवी लाटकर, अक्षय निर्मळ, तसेच विद्यार्थी हर्षवर्धन शिंदे, स्वप्नील चौधरी, अनंत शेळके आदी उपस्थित होते.