जुन्नर : येणेरे (ता. जुन्नर) येथील ठाकरवाढीमधील अजित देवराम काळे (वय २४) यांचे पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. मुलगा अभ्यासात हुशार असल्याने आई – वडिलांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन मुलाचे पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. स्वप्न साकार होण्याची वेळ आली अन् नियतीने या कुटुंबाच्या स्वप्नांवर पाणी फेरले. कर्तृत्वाच्या जोरावर यशाकडे वाटचाल करणाऱ्या हरहुन्नरी शिक्षकाचे गुरुपौर्णिमेच्या दिवशीच निधन झाल्याने काळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. देवराम काळे यांचा एकुलता एक आधार असलेल्या अजित काळे यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे .
गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी पुणे विद्यापीठातून रसायनशास्त्र विषयात एमएस्सीचे शिक्षण पूर्ण केले होते. एमपीएससी व यूपीएससी परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून मंचर येथील अण्णासाहेब आपटे महाविद्यालयात तासिका तत्त्वावर हंगामी प्राध्यापक म्हणून काम देखील केले.
अर्धागवायूचा झटका आल्याने त्यांना जुन्नर येथे खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मेंदूची तपासणी केल्यानंतर मेंदूमध्ये ब्लॉकेज असल्याचे निदान झाले. तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याने ४ जुलै रोजी पुणे येथे ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. ५ जुलै रोजी त्याच्यावर शस्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र त्या आधीच सकाळी साडेसहाच्या सुमारास उपचारादरम्यान निधन झाले.
आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच व मित्र परिवार अजितच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याचे संजय साबले, गणपत घोडे, सुनील कोरडे यांनी महाराष्ट्र भूमी न्यूज़ पोर्टलशी बोलताना सांगितले.