रत्नागिरी : आदिवासी आश्रमशाळेतील कर्मचा-यांना 50 लाख रूपये विमा संरक्षण मिळावा, अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे कोकण विभाग प्रमुख व अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने कोरोना काळात काम करणा-या आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी यांना प्रत्येकी 50 लाख रूपये विमा संरक्षण योजना जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे आदिवासी आश्रम शाळेतील कोरोना कालावधीत कर्तव्य बजावणा-या कर्मचारी यांनाही 50 लाख रूपये विमा संरक्षण योजना लागू करण्यात यावी. राज्य शासनाच्या आदिवासी आश्रम शाळेतील 53 कर्मचारी यांचा कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे मृत्यू झाला. खावटी योजनेच्या कामामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे या कर्मचा-यांचा मृत्यू झाला, असा आरोप शिक्षकांनी व कुटुंबियांनी केला आहे.
कोरोना महामारीच्या दुस-या लाटेत विक्राळ रूप धारण केलेले आहे. अनेकांना वेगाने कोरोनाचा संसर्ग होत आहे. महाराष्ट्र राज्यात मृत्यदर वाढतच आहे. यात आदिवासी विभागामार्फत चालवल्या जाणा-या आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचा-यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. यात नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा व नंदुरबार प्रकल्पातर्गत येणा-या एकूण 11 आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचारी यांचा समावेश आहे. यात शिक्षक व मुख्याध्यापक यांचाही समावेश आहे. खावटी योजनेच्या कामासाठी या कर्मचा-यांना लाभार्थीपर्यंत जावे लागले. तसेच इतर कामासाठी ही लोकांपर्यंत जावे लागते. साहजिकच लोकांशी संपर्क होऊन कोरोनाची लागण होण्याचे शक्यता नाकारता येत नाही. शिवाय या कामांत कर्मचा-यांना कोरोनाचा धोका आहेस. म्हणूनच आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी यांना 50 लाख रूपये कोरोना विमा संरक्षण योजना जाहीर केली त्याचप्रमाणे आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचा-यांनाही 50 लाख रूपये विमा संरक्षण मिळावे, अशी मागणी पावरा यांनी शासनाकडे केली आहे.