Thursday, December 26, 2024
Homeजिल्हातुम्हाला आम्ही आंडू-पांडू वाटलो का ? मंत्री बाळासाहेब थोरातांवर माकप नेते अजित...

तुम्हाला आम्ही आंडू-पांडू वाटलो का ? मंत्री बाळासाहेब थोरातांवर माकप नेते अजित नवले संतापले

अहमदनगर : मंत्री – संत्री आले म्हणून धावत सुटणारे लाळघोटे कार्यकर्ते आम्ही नाही. तुम्हाला आम्ही आंडू-पांडू वाटलो का, असा सवाल करत सोमवारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉ.अजित नवले यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांवर हल्लाबोल चढवला. त्यांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह लावतानाच रेमडेसिवीर व ऑक्सीजन पुरवठ्यात दुजाभाव केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

रेमडेसीवीर व ऑक्सिजन न मिळाल्यामुळे ज्यांचे आई बाप करोनामुळे तडफडून मरतील, त्या तरुणांचा संताप अनावर झाल्याशिवाय राहणार नाही. भविष्यात त्याचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा देतानाच संगमनेर तालुक्यात आमच्या विविध संघटनांचे कामगार आहेत, असा इशारा त्यांनी दिला.

रविवारी अकोले येथे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झालेल्या करोना आढावा बैठकीत गोंधळ झाला होता. या बैठकीबाबत डॉ.नवले यांनी सोशल मिडियावरून भूमिका मांडली. संगमनेरच्या तुलनेत अकोलेला रेमडेसिवीर व आॅक्सिजनचा पुरवठा कमी होत असल्याबद्दल डॉ.नवले यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी अकोले येथे आंदोलन केले होते.

अकोले व संगमनेर असा वाद नाही, पण धाकट्या भावाच्या ताटात अधिक वाढणे ही मोठ्या भावाची जबाबदारी असते, याची आठवण त्यांनी थोरातांना करून दिली. संगमनेर मध्ये सर्वच काही अलबेल आहे, असेही काही नाही. मात्र वेळ राजकारण करण्याची नाही. माणूस म्हणून उभे राहण्याची आहे, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीसाठी तासभर नामदारांची वाट पाहत बसलेल्या स्थानिक आमदारांना न सांगताच बैठक सुरू करण्यात आली, हे कोणाच्या सांगण्यावरून केले? ज्यांनी करोना उपचाराबाबत आवाज उठवला, त्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बैठकीत टाळण्यात आले, असा आक्षेपही त्यांनी घेतला.


संबंधित लेख

लोकप्रिय