मावळ / क्रांतिकुमार कडुलकर : आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या आदिम सेवा अभियानांतर्गत मावळातील इंदोरी व सुदुंबरे येथील २८४ ठाकर बांधवांना स्वातंत्र्यानंतर प्रथमच जातीच्या दाखल्यांचे वाटप मंगळवार (दि.१५) मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांच्या हस्ते करण्यात आले.
इंदोरी येथील हनुमान मंदिर व सुदुंबरे येथील ठाकर वस्ती येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास आलेल्या पाहुण्यांचे ग्रामस्थांकडून वाजत गाजत, ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार सुनिल शेळके, तहसीलदार विक्रम देशमुख, मंडलाधिकारी बजरंग मेकाले, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, दिपक हुलावळे, सरपंच शशिकांत शिंदे, उपसरपंच धनश्री शिंदे व आजी-माजी सरपंच, सदस्य, ग्रामस्थ आदी.उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही ठाकर समाजातील अनेक नागरिकांकडे आजही जातीचे दाखले उपलब्ध नाहीत. शैक्षणिक कामांसाठी, शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. परंतु ज्यांचे पूर्वज शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर होते तसेच भूमीहीन होते. अशा कुटुंबातील नागरिकांना जात प्रमाणपत्र काढण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागतो. व दाखला मिळत नसल्याने अनेक शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागते. आजपर्यंत विविध शिबिरे, योजनांच्या नावाखाली केवळ कागदपत्रे जमा केली जातात. परंतु सर्व प्रक्रिया पूर्ण करुन दाखले कोणीही मिळवून देत नव्हते. त्यामुळे आश्वासनांशिवाय या नागरिकांच्या पदरात काहीच पडले नव्हते.
परंतु आमदार शेळके यांनी आदिम सेवा अभियान राबवित तालुक्यातील प्रत्येक वाडी-वस्तीवर जाऊन कागदपत्रांची पूर्तता करुन घेणे व शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणे यामुळे या नागरिकांना दाखले उपलब्ध झाले आहेत. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जातीचे दाखले मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
‘ठाकर समाज सक्षम होण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना पाठबळ देणे हे माझे कर्तव्य आहे. माझ्या ठाकर बांधवांना त्यांचा अधिकार मिळाला याचे मला समाधान आहे. फक्त आश्वासने न देता त्यांच्या समस्या प्रत्यक्षात सोडवण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहील.’
– आमदार सुनिल शेळके