Friday, December 27, 2024
Homeआंतरराष्ट्रीय"लोकशाही म्हणजे कोकाकोला नाही, सगळीकडे सारखी चव असेल" चीनची अमेरिकेवर तुफान टीका

“लोकशाही म्हणजे कोकाकोला नाही, सगळीकडे सारखी चव असेल” चीनची अमेरिकेवर तुफान टीका

चीन : चीनला आपला निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार आहे. अमेरिकेने त्याचा सन्मान करावा,” अशा शब्दांत चीनने अमेरिकेला सुनावलं आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र विषयक परिषदेचे अध्यक्ष रिचर्ड हास यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यादरम्यान दोन्ही देशांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध कायम राखण्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत अमेरिकेकडून सुमारे पाचशे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

वांग यी म्हणाले, “अमेरिका चीनचा शांततापूर्ण विकास कितपत स्वीकारतो, त्यावर दोन्ही देशांमधील संबंध अवलंबून आहेत. चीनच्या नागरिकांनाही चांगलं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. चिनी नागरिकांच्या या अधिकारांचा सन्मान करण्यास अमेरिका तयार आहे का?”

लोकशाही ही काय कोकाकोला नाही. जगाच्या कानाकोपऱ्यात त्याची एकसारखी चव असेल, असं आपल्याला म्हणता येणार नाही, असंही वांग यी म्हणाले. ही माहिती ग्लोबल टाईम्स या चीनच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या एका बातमीत देण्यात आली आहे. वांग यी पुढे म्हणाले, “चीनने स्वीकारलेल्या मार्गाचा आदर अमेरिकेने करायला हवा. चीनच्या संदर्भात अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात अनेक गैरसमज आहेत. चीनसोबतचे संबंध सुरळीत करण्यासाठी ते अजूनपर्यंत योग्य मार्ग शोधू शकले नाहीत.”

दोन्ही देशांत सौहार्दपूर्ण संबंध तयार होण्यासाठी वांग यी यांनी पाच पर्याय दिले. या पर्यायांवर रणनितीकदृष्ट्या लक्ष देणं गरजेचं आहे, असं त्यांनी म्हटलं.

वांग यी यांनी दिलेले पाच पर्याय –

1. चीनच्या विकासाला निःपक्षपाती आणि तर्कसुसंगत स्वरुपात समजून घेण्याचा अमेरिकेने प्रयत्न करावा.

2. दोन्ही देशांचं सह-अस्तित्व आणि एकमेकांच्या हितासाठी अमेरिकेला चीनसोबत नव्या पद्धतीने काम केलं पाहिजे.

3. चीनने आपला मार्ग स्वतः निवडला आहे. त्याचा अमेरिकेने सन्मान करावा. त्यांनी याबाबत सहनशीलता दाखवावी.

4. अमेरिकेने प्रत्यक्षात बहुध्रुवीय जगाचा स्वीकार करावा.

5. चीनच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करणं अमेरिकेने टाळावं.

बैठकीदरम्यान वांग यी यांनी एका चिनी म्हणीचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, “संपूर्ण जगावर हुकूमत गाजवण्याची इच्छा असलेला देश अयशस्वी होणं निश्चित आहे, यावर चीन विश्वास ठेवतो. शक्तिशाली बनल्यानंतर जगावर वर्चस्व गाजवण्याचा चीनचा विचार नाही. अमेरिका एक ना एक दिवस खऱ्या अर्थाने बहुपक्षवादाचा पालन करेल, असंही ते म्हणाले.

या बैठकीत वांग यी यांनी तैवानचाही उल्लेख केला. तैवान प्रकरणात हस्तक्षेप करणं आगीशी खेळण्यासारखं आहे, असा इशारा त्यांनी दिला.

“अमेरिकेने वन चायना पॉलिसीचं पालन करावं. चीन आणि अमेरिका यांच्यादरम्यान यापूर्वी तीनवेळा बातचीत झाली आहे. त्यानुसार अमेरिकेने प्रतिबद्धतेनं पालन करावं. झिनझियांग प्रांतात कापूस शेती करणाऱ्या विगर मुस्लीम नागरिकांवर जोर-जबरदस्ती केल्याचे आरोप वांग यी यांनी फेटाळून लावले. राजकीय स्वार्थापोटी नरसंहार आणि जबरदस्ती मजुरी यांच्यासारखे खोटे आरोप केले जात आहेत,” असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

हाँगकाँगबद्दल बोलताना वांग यी म्हणाले, “एक देश दोन प्रणाली अंतर्गत चीन सरकारच्या प्रयत्नांचा अमेरिकेने आदर करावा.” चीन इतर देशांसोबत जोर-जबरदस्ती करण्याचा विरोध करतो. इतर देशांनीही त्यांच्या अंतर्गत विषयांत हस्तक्षेप करू नये, अशी चीनची इच्छा आहे, असं वांग यी यांनी म्हटलं.

संबंधित लेख

लोकप्रिय