Friday, October 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमाकप पिंपरी चिंचवड शहराचे अधिवेशन संपन्न

माकप पिंपरी चिंचवड शहराचे अधिवेशन संपन्न

एसटी कर्मचारी आणि प्रवाश्यांचे महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात मोठे योगदान – अजित अभ्यंकर

चिखली : भारतासारख्या देशामध्ये सतत खोटे बोलून, सरकारी तपास यंत्रणांचा गैरवापर करून आणि लोकांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करून राज्य करता येणार नाही, याचे दर्शन शेतकऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या आंदोलनामधून दिसून आले आहे. सत्तेची मुजोरी आलेल्या मोदी आणि शहा सरकारला शेतकऱ्यांनी उत्तम धडा शिकवला असून येत्या काळात त्यामधून भारतातील अदानी अंबानी यांच्या कार्पोरेटशाहीला चाप लावण्यासाठी जनतेचे हात बळकट झाले आहेत. सत्य अहिंसा आणि संयत मार्गाचा अवलंब करूनही आंदोलने यशस्वी करता येतात, याचा वस्तुपाठ शेतकऱ्यांनी आपल्या संयमातून घालून दिला आहे. कामगार चळवळीने यांच्यापासून प्रेरणा घ्यावी” असे आवाहन कॉम्रेड अजित अभ्यंकर यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर अधिवेशनाचे उद्घाटन चिखली करताना केले.

एस टी कर्मचाऱ्यांचा संप आणि राज्यातील कामगार वर्गाच्या विविध मागण्यांवर बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकरी आंदोलनापासून बोध घेतला पाहिजे, केंद्र सरकारने बदललेले नवे कामगार कायदे महाराष्ट्रात लागू होणार नाहीत, शेतकरी विरोधी कायदे केले जाणार नाहीत, यासाठी राज्य सरकारने स्पष्ट धोरण आखण्याची गरज आहे.

एसटी संपाबाबत ते म्हणाले की, महामंडळाचे कर्मचारी आणि लाखो प्रवासी महाराष्ट्राला समृद्ध करत असतात. विश्वसनीय आणि माफक दरात सेवा  देणाऱ्या महामंडळाचे खाजगीकरण करण्याच्या योजना सरकारने सोडून द्याव्यात. त्याच प्रमाणे एसटी कामगारांच्या संपाला चिथावणी देऊन संधिसाधू भूमिका घेणाऱ्या भाजपची एसटी संपाबाबतची भूमिका खोटारडी, दांभिक आणि चिथावणीखोर असल्याची उदाहरणे त्यांनी स्पष्ट केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील इत्यादी नेत्यांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.

चिखली येथे झालेल्या जाहीर सभेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पुणे जिल्हा सचिव नाथा शिंगाडे म्हणाले की, केंद्रातील सरकारने महसूल वाढीसाठी पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलिंडरवर प्रचंड करवाढ केल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सामान्यांच्या अवाक्याबाहेर गेल्या आहेत. सरकारच्या जनविरोधी धोरणाविरोधात व्यापक आंदोलन उभे करण्याची गरज आहे. यावेळी माकप पिंपरी चिंचवडचे सचिव कॉम्रेड गणेश दराडे यांनी सभेचे प्रास्ताविक केले.

यावेळी सतिष नायर, अमिन शेख, सचिन देसाई, संजय ओव्हाळ, सुषमा इंगोले, स्वप्नील जेवळे, बाळासाहेब घस्ते, सुभाष काळकुद्रीकर, एस.के. पोनप्पन, निर्मला येवले, मंगल डोळस, विनोद चव्हाण, देविदास जाधव, अपर्णा दराडे यांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर 

संबंधित लेख

लोकप्रिय