प्रतिनिधी :- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्यूरोने विविध मागण्यांसाठी केंद्र सरकारच्या विरोध जनतेने आंदोलन करण्याची हाक दिली होती.
माकपाच्या वतीने डहाणू तालुक्यात आंबेसरी विभागात कोमगाव येथे प्रभावी निषेध सभा व निदर्शन करण्यात आली. या सभेला अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे, आमदार विनोद निकोले रमेश घुटे, सुरजी वेडगा, जि. प. सदस्य सतीश करबट, पं. स. सदस्या नैना खेवरा यांनी संबोधित केले.
इन्कम टॅक्स लागू नसलेल्या प्रत्येक कुटुंबाला सहा महिने दरमहा ७ हजार ५०० रुपये रोख दिले पाहिजेत, सहा महिने दरडोई १० किलो धान्य मोफत पुरवले पाहिजे, मनरेगा अंतर्गत वाढीव मजुरी देऊन किमान २०० दिवस रोजगार पुरवला पाहिजे. शहरी गरिबांसाठीसुद्धा ही योजना लागू करा.
बेरोजगारांना ताबडतोबीने बेरोजगार भत्ता जाहीर करा, राष्ट्रीय संपत्तीची लूट, सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण थांबवा;
कामगार कायदे रद्द करायचे धोरण मागे घ्या, सर्व शेतकऱ्यांना तातडीने कर्ज माफ करुन, तात्काळ नविन कर्ज वाटप करा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.