प्रतिनिधी :- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नांदगाव खंडेश्वर येथे जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
देशात आधीच बेरोजगारीने जनता त्रस्त असताना लॉकडाउन मध्ये १५ कोटी जनतेचा असलेला रोजगार हातातून निघून गेला आहे, त्यामुळे देशातील प्रचंड मोठा जनविभाग भुखमरीच्या उंबरठ्यावर आलेला आहे. या परिस्थितीत केंद्रातील मोदी सरकार जनतेला दिलासा देण्याऐवजी त्यांना आत्मनिर्भर व्हायला सांगते आहे, ह्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने निषेध केला.
शेतकऱ्यांना विना अट पीक कर्ज देण्यात यावे, शेती पंपाकरिता मोफत व २४ तास वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावा, लॉकडाऊन काळातील घरगुती विज बिल माफ करण्यात यावे, इन्कम टॅक्स लागू नसलेल्या प्रत्येक कुटुंबाला ७ हजार ५०० रुपये रोख देण्यात यावे, सहा महिने दरडोई १० किलो धान्य मोफत देण्यात यावे, बेरोजगारांना ताबडतोब बेरोजगार भत्ता जाहीर करावा, मनरेगा अंतर्गत वाढीव मजुरी देऊन २०० दिवस रोजगार देण्यात यावा,
शहरी कामगारांसाठीही मनरेगा सुरू करून रोजगार द्यावा, राष्ट्रीय संपत्तीची लूट व सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण थांबवा, कामगार कायदे रद्द करण्याचे धोरण मागे घ्या, वनाधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा, जबरानजोत शेतकऱ्यांना बळाच्या वापर करून जमिनीवरून हुसकावणे बंद करा आदी मागण्या करण्यात आल्या.
शाम शिंदे, अब्दुल मोहसीन, विशाल पाटमासे, अनिल मारोटकर, किशोर शिंदे, विशाल शिंदे, राजगुरु शिंदे, विजय सहारे, सुरेश हळदे, राजु राऊत आदी सहभागी झाले होते.