Friday, May 3, 2024
Homeसंपादकीयविशेष लेख : कॉ.डॉ.विठ्ठल मोरे – डाव्या चळवळीच्या आसमंतातील तेजस्वी तारा

विशेष लेख : कॉ.डॉ.विठ्ठल मोरे – डाव्या चळवळीच्या आसमंतातील तेजस्वी तारा

आज १७ सप्टेंबर. बरोबर एका वर्षांपूर्वी १७ सप्टेंबर २०२० रोजी कॉ. डॉ. विठ्ठल मोरे आपल्या सर्वांना सोडून गेले. तो अतीव धक्का देणारा दिवस मी आयुष्यभर कधीच विसरू शकणार नाही. १७ सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्रामाचा विजय दिवस. त्या ऐतिहासिक दिवसाशी विठ्ठल यांचे आधीच घनिष्ठ असलेले नाते अशा प्रकारे कायमचे जोडले गेले. Comrade Dr.Vitthal More – the bright star in the sky of left movement

गेल्या वर्षी त्या दिवशी सकाळी महाराष्ट्रातील डाव्या चळवळीवर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षावर आणि विशेषतः मराठवाड्यातील समग्र परिवर्तनवादी चळवळीवर प्रचंड शोककळा पसरली. कॉ. डॉ. विठ्ठल मोरे कोरोनामुळे मृत्युमुखी पडल्याची अत्यंत वेदनादायी बातमी आली. पक्षातील आणि पक्षाबाहेरील असंख्य जणांनी भावनावश होऊन फेसबुक आणि व्हाट्सअप्पवर दिलेल्या प्रतिक्रियांचा अक्षरशः महापूर लोटला. थेट हृदयातून दिलेल्या त्या प्रतिक्रियांवरून विठ्ठल यांच्या असामान्य जीवनकार्याचा आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा परिचय सर्वांनाच पुन्हा झाला.

विठ्ठल मोरे हे सर्वार्थाने अजातशत्रू होते. मी एकदा त्यांचे असे वर्णन त्यांच्यासमोरच केले तेव्हा त्यांची प्रतिक्रिया त्यांच्या सुपरिचित लोभस स्मितहास्याची होती. “झाले बहु, होतिल बहु, परि या सम हा” ही सुप्रसिद्ध उक्ती विठ्ठल मोरेंना अगदी चपखल लागू पडत होती.

विठ्ठल कोरोनामुळे आजारी असल्याची त्यापूर्वीचे दोन आठवडे कल्पना होती. ते लातूरच्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये होते. विठ्ठल यांच्याशी तेव्हा फोनवर त्यांची प्रकृती विचारण्यापुरते थोडे बोलणेही झाले. ते बोलणे अखेरचेच ठरावे हे केवढे दुर्दैव ! त्यानंतर त्यांचे चिरंजीव संग्राम आणि पुतणे संजय यांच्याशी नियमित संपर्कात होतो. दोनच दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे या दोघांनी सांगितले होते.

पण त्या दिवशी सकाळी कॉ. नरसय्या आडम आणि कॉ. डॉ. एस के. रेगे यांचे ही धक्कादायक बातमी देणारे फोन खणखणले आणि आभाळच कोसळले. मन सुन्न झाले. डोळे पाणावले. अश्रू अनावर झाले. गेल्या चार दशकांचे विठ्ठल यांच्यासोबतचे अत्यंत घनिष्ठ संबंध, असंख्य जिव्हाळ्याचे प्रसंग एखाद्या चित्रपटासारखे डोळ्यासमोर तरळले. आमच्या पिढीमधील विठ्ठल मोरे हे निःसंशय माझे सर्वात जवळचे मित्र आणि कॉम्रेड होते. खरं तर ते माझ्या मोठ्या भावासारखेच होते. विठ्ठल यांच्या जाण्याने माझ्याप्रमाणेच इतर असंख्य जणांचा एक आधारस्तंभ कोसळला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा आणि डाव्या परिवर्तनवादी चळवळीचा एक आधारवड हरपला.

५ सप्टेंबरला पक्षाचे आणि सीटूचे लढाऊ नेते कॉ. उद्धव भवलकर यांचेही कोरोनामुळे तितकेच धक्कादायक निधन झाले होते. त्याला पंधरवडाही उलटलेला नव्हता. महाराष्ट्राच्या आणि विशेषतः मराठवाड्याच्या पक्षावर आणि डाव्या चळवळीवर हा दुसरा तीव्र महाआघात होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. अरुण शेळके, मोहन शिंदे आणि धडाडीचे जिल्हा सचिव तानाजी वाघमारे यांच्या निधनानेही अपरिमित हानी झाली.

विद्यार्थी चळवळीपासून सुरुवात

विठ्ठल शहाजीराव मोरे यांचा जन्म भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याच जयंतीदिनी, १४ एप्रिल १९४९ रोजी लातूर तालुक्यातील गांजूर या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे थोरले बंधू कॉ. हरिदास मोरे हे पक्षाचे नेते कॉ. गंगाधर अप्पा बुरांडे आणि कॉ. गुंडाप्पा जिरगे यांच्या संपर्कातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात सामील झाले. क्रांतिसिंह कॉ. नाना पाटील यांचाही त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. गावात भगतसिंग ग्रंथालय आणि भगतसिंग क्रीडा मंडळ त्यांनी सुरू केले. विठ्ठल यांचे शालेय शिक्षण रेणापूर तालुक्यात झाल्यावर पदवी शिक्षणासाठी ते लातूरच्या दयानंद महाविद्यालयात गेले आणि पुढे पदव्युत्तर शिक्षणासाठी औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठात गेले.

१९७० साली कॉ. गंगाधर अप्पांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्याच्या मोहा गावात स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) ची महाराष्ट्रातील पहिली शाखा सुरू झाली. विठ्ठल मोरे, उद्धव भवलकर, अरुण शेळके, अंबादास ढेपे हा उस्मानाबाद जिल्ह्यातील संच (तेव्हा लातूर जिल्हा वेगळा झाला नव्हता) एसएफआय मध्ये सक्रिय झाला. काही काळानंतर गांजूरमध्येही शाखा सुरू झाली आणि विश्वंभर भोसले तिचे सचिव झाले. एसएफआय चे मराठवाडा विभागीय संमेलन परळी वैजनाथ येथे झाले. त्यानंतर २७-३० डिसेंबर १९७० रोजी एसएफआय चे पहिले राष्ट्रीय अधिवेशन केरळमध्ये त्रिवेंद्रमला झाले. त्यात विठ्ठल यांनी महाराष्ट्रातून गेलेल्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले. त्या काळात विठ्ठल यांनी “सद्यस्थिती : युवकांना आवाहन” ही पहिली छोटेखानी पुस्तिका लिहून एसएफआय तर्फे प्रकाशित केली.   

१९७४ साली तेव्हाच्या परभणी जिल्ह्यात वसमत येथे बेरोजगार तरुणांवर पोलीस गोळीबार झाला आणि मराठवाडा विकास आंदोलन पेटले. त्यात विठ्ठल, उद्धव आणि इतरांना १५ दिवस तुरुंगवास घडला. जानेवारी १९७५ मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब येथे एसएफआय चे स्थापना राज्य अधिवेशन वर उल्लेख केलेल्या संचाच्या पुढाकाराने यशस्वी झाले. एसएफआय चे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश कारत हे प्रमुख पाहुणे म्हणून, तर अहिल्या रांगणेकर, गंगाधर अप्पा बुरांडे व प्रा. किशोर ठेकेदत्त हे जाहीर सभेचे वक्ते म्हणून हजर होते. महाराष्ट्र एसएफआय चे संस्थापक अध्यक्ष म्हणून विठ्ठल यांची त्या अधिवेशनात निवड झाली. त्याच्या सहा महिन्यांनंतरच २६ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लादली गेली.        

जानेवारी १९८३ पर्यंत, बीडमध्ये झालेल्या एसएफआय च्या चौथ्या राज्य अधिवेशनापर्यंत विठ्ठल राज्य अध्यक्ष होते. त्या काळात अनेक मोठी विद्यार्थी आंदोलने महाराष्ट्रात झाली. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देऊन त्याचे नामांतर झाले पाहिजे या मागणीसाठी झालेल्या सामाजिकदृष्ट्या अत्यंत कळीच्या आंदोलनात विठ्ठल यांनी एसएफआय चे नेतृत्व केले. शिक्षणक्षेत्रात तेव्हा नुकत्याच सुरू झालेल्या विनाअनुदान तत्त्वाविरुद्ध, म्हणजेच शिक्षणाच्या बाजारीकरणाविरुद्ध आणि विविध ठिकाणच्या फी वाढीविरुद्ध बंडाचा झेंडा महाराष्ट्रात प्रथम एसएफआय ने फडकवला.   

माझे सुखद अनुभव

विठ्ठल यांच्याशी माझी पहिली भेट झाली ती जानेवारी १९७९च्या बुलडाणा जिल्ह्यात खामगाव येथील एसएफआय च्या दुसऱ्या राज्य अधिवेशनात. त्यांच्या मनमिळाऊ आणि प्रेमळ स्वभावाने आणि त्यांच्या प्रभावी वक्तृत्वामुळे मी खूपच प्रभावित झाल्याचे मला आजही चांगलेच आठवते. मी आदल्या वर्षीच १९७८ साली आधी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात व नंतर पक्षाच्या आदेशानुसार एसएफआय मध्ये प्रवेश केला होता. मी तेव्हा एमबीबीएस पूर्ण करून डॉक्टरकीचा व्यवसाय करत मुंबई विद्यापीठात एमए (राज्यशास्त्र) शिकत होतो. डॉ. य. दि. फडके आणि डॉ. उषा मेहता यांसारखे दिग्गज आमचे प्राध्यापक असायचे.  

जानेवारी १९८१ मध्ये अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर येथील तिसऱ्या राज्य अधिवेशनात एसएफआय च्या राज्य सरचिटणीसपदी माझी निवड झाल्यानंतर अध्यक्ष विठ्ठल यांच्यासोबत अतिशय जवळून काम करण्याची संधी मिळाली. तो खरोखरच एक अनमोल अनुभव होता. आमच्यामध्ये जो अतूट जिव्हाळा तेव्हा निर्माण झाला तो अखेरपर्यंत केवळ टिकला एवढेच नव्हे, तर तो दिवसेंदिवस वाढतच गेला. माझी नव्यानेच राज्य सरचिटणीस म्हणून निवड झाल्यामुळे त्यांचे अचूक व अनुभवी मार्गदर्शन मला सतत लाभायचे. 

“सर्वांना शिक्षण, सर्वांना काम” हे विद्यार्थी-युवकांचे आंदोलन आणि १५ सप्टेंबर १९८१ चा एसएफआय व डीवायएफआय यांचा पहिला संयुक्त दिल्ली मोर्चा खूप गाजला. डिसेंबर १९८१ मध्ये मुंबईत दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात एसएफआय चे चौथे राष्ट्रीय अधिवेशन सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झाले. महाराष्ट्रात होणारे एसएफआय चे ते पहिलेच राष्ट्रीय अधिवेशन होते. त्याचे यजमानपद महाराष्ट्र एसएफआय कडे होते. राज्यभरातील शेकडो विद्यार्थी कार्यकर्त्यांनी या अधिवेशनाच्या यशासाठी तीन महिने अथक परिश्रम घेतले. अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष सुप्रसिद्ध पुरोगामी साहित्यिक कैफी आझमी हे होते, उदघाटन नावाजलेले मार्क्सवादी इतिहासकार डॉ. इरफान हबीब यांनी केले, आणि जाहीर सभेचे प्रमुख वक्ते केरळचे माजी मुख्यमंत्री कॉ. ई. के. नायनार हे होते. 

मे १९८६ मध्ये डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) चे स्थापना राज्य अधिवेशन मुंबईत आदर्श विद्यालयात झाले. त्या अधिवेशनात आम्ही सर्व तेव्हाच्या एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले. डीवायएफआय चे संस्थापक राज्य अध्यक्ष म्हणून कॉ. डॉ. विठ्ठल मोरे आणि संस्थापक राज्य सरचिटणीस म्हणून कॉ. महेंद्र सिंह यांची निवड झाली. त्यामुळे संघटनेला भक्कम पाया लाभला. हे दोन्ही उत्कृष्ट नेते वर्षभराच्या अंतराने आपल्याला सोडून जावेत हे केवढे दुर्दैव ! 

मे १९८९ मध्ये ठाणे जिल्ह्यात डोंबिवली येथे झालेल्या डीवायएफआय च्या दुसऱ्या राज्य अधिवेशनात अध्यक्ष म्हणून विठ्ठल यांची फेरनिवड झाली आणि सरचिटणीस म्हणून कॉ. महेंद्र सिंह निवृत्त होऊन त्या जागी माझी निवड झाली. अध्यक्ष आणि सरचिटणीस म्हणून विठ्ठल आणि माझी जोडी एसएफआय नंतर डीवायएफआय मध्ये पुन्हा जमली.

१९८० आणि १९९०च्या दशकात महाराष्ट्रात एसएफआय आणि डीवायएफआयने संयुक्तपणे अनेक मोठे आणि जबरदस्त लढे केले. महाराष्ट्रातील सर्व पुरोगामी विद्यार्थी-युवा संघटनांनी एकत्र येऊन बनवलेल्या ‘युवा विद्यार्थी हक्क संघर्ष समिती’च्या नेतृत्वाखाली २५ ते ३० हजार विद्यार्थी आणि युवांचे राज्यव्यापी मोर्चे मुंबईत अनेकदा निघाले. अनेक मंत्र्यांना थेट मंत्रालयात घेराव घातले गेले. पोलिसांशी मारामाऱ्या झाल्या. शेकडो कार्यकर्त्यांना अटक होऊन त्यांच्यावर केसेस झाल्या. २३ सप्टेंबर १९८७ ला एसएफआय-डीवायएफआयने दिल्लीच्या बोट क्लबवर काढलेल्या विशाल देशव्यापी मोर्चात महाराष्ट्रातील १० हजाराहून अधिक विद्यार्थी व युवा सहभागी झाले. 

ऑक्टोबर १९९१ मध्ये मुंबईत दादर येथील राजा शिवाजी विद्यालयात डीवायएफआयचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन भरले. महाराष्ट्रात भरणारे डीवायएफआय चे ते पहिलेच राष्ट्रीय अधिवेशन होते. त्याचे यजमानपद महाराष्ट्र डीवायएफआय कडे असल्याने राज्यातील शेकडो युवा कार्यकर्त्यांनी त्याच्या यशासाठी अनेक महिने अथक कार्य केले. अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष पुरोगामी चित्रपट निर्माते सईद मिर्झा हे होते आणि उदघाटन सुप्रसिद्ध पुरोगामी चित्रकार विवान सुंदरम यांनी केले. शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या विशाल जाहीर सभेत पश्चिम बंगालचे उत्तुंग मुख्यमंत्री कॉ. ज्योती बसू हे प्रमुख वक्ते होते. 

या दोन्ही महत्त्वाच्या राज्यव्यापी विद्यार्थी-युवा संघटना उभारण्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. पी. बी. रांगणेकर यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन आम्हाला सातत्याने लाभले याचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. उभारणीच्या ह्या कार्यात इतर अनेक कॉम्रेड्ससोबत दोन्ही संघटनांचे संस्थापक राज्य अध्यक्ष म्हणून विठ्ठल यांचा मोठा वाटा होता. त्यांचे सर्वात कळीचे योगदान होते एकजुटीने कार्य करणारा कार्यकर्त्यांचा संच बांधणे. त्यांच्या नेतृत्वावर सर्वांचाच विश्वास असायचा. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. टीका करायचे तेव्हा सुद्धा इतक्या मृदू पण उपहासपूर्ण भाषेत करायचे की समोरचे दुरुस्तच व्हायचे. त्यांच्याविषयीचे अनेक प्रेरणादायक किस्से आहेत, पण स्थलाभावी ते येथे देणे शक्य नाही. 

६ डिसेंबर १९९२ रोजी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनीच!) अयोध्येची बाबरी मशीद संघ परिवाराने उद्ध्वस्त केली आणि डॉ. आंबेडकर शिल्पकार असलेल्या भारतीय घटनेला सुरुंग लावण्याचा निषेधार्ह प्रयत्न केला. त्यानंतर लगेच शिवसेनेने मुंबईच्या भीषण धर्मांध दंगली पेटविल्या. न्यायमूर्ती श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालानुसार या दंगलीत ९०० निरपराध लोक मृत्युमुखी पडले. त्याच्या पुढच्याच महिन्यात, अत्यंत तणावग्रस्त परिस्थितीत जानेवारी १९९३ मध्ये लातूर येथे विठ्ठल यांच्याच पुढाकाराने डीवायएफआय चे तिसरे राज्य अधिवेशन भरले, आणि त्यातच राज्य अध्यक्ष म्हणून ते निवृत्त झाले. पण त्यानंतरही त्यांचे विद्यार्थी-युवा चळवळीकडे बारकाईने लक्ष असे, लागेल ती सर्व मदत ते नेहमीच करत असत. डाव्या चळवळीचे भवितव्य तरुणाईवर अवलंबून आहे हे त्यांनी पक्के ओळखले होते.

प्राध्यापक संघटनेत कार्य

उस्मानाबाद जिल्ह्यात वाशी येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात १९७५ ते २००७ हा प्रदीर्घ काळ विठ्ठल यांनी राज्यशास्त्र हा विषय प्रभावीपणे शिकवला. पुढे शिवाजी महाविद्यालय, रेणापूर आणि किल्लारीच्या भूकंपानंतर त्यांच्याच पुढाकाराखाली उभारल्या गेलेल्या किल्लारीतील शहीद भगतसिंग महाविद्यालयात प्राचार्य म्हणून त्यांनी आपली जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली. विद्यार्थ्यांत तसेच प्राध्यापकांत ते अतिशय लोकप्रिय असत, हे मी स्वत: ते शिकवत असलेल्या कॉलेजांना जेव्हा अनेकदा भेट दिली तेव्हा पाहिले आहे. किल्लारीच्या उत्कृष्ट कॉलेजला दिलेली भेट तर मी कधीच विसरणार नाही.

मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या प्राध्यापक संघटनेत विठ्ठल यांनी अनेक वर्षे अत्यंत नेटाने कार्य केले. दोन्ही पातळ्यांवरील संघटनांचे ते अनेक वर्षे पदाधिकारी राहिले. राज्य स्तरावर प्रा. किशोर ठेकेदत्त, प्रा. सी. आर. सदाशिवन, प्रा. ताप्ती मुखोपाध्याय, प्रा. मधु परांजपे आणि मराठवाडा स्तरावर इतर अनेक जण हे त्यांचे समर्थ सहकारी होते. प्राध्यापकांचे अनेक संपलढे व आंदोलनांचे त्यांनी मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात नेतृत्व केले. अनेक प्रश्न या संघर्षांतून मार्गी लागले. ती एक स्वतंत्र कहाणी आहे.  

२००८ साली विठ्ठल यांनी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेची निवडणूक जोमाने लढवली. त्यांचे जिवलग सहकारी कॉ. पी. एस. घाडगे, मराठवाड्यातील सर्व पक्ष नेते आणि कार्यकर्ते, असंख्य शिक्षक व प्राध्यापक, त्यांचे चिरंजीव संग्राम, पुतणे संजय व इतर अनेक तरुणांनी प्रयत्नांची शिकस्त केली. ते विजयी झाले नसले तरी त्यांना खूप चांगली मते मिळाली. मराठवाड्यातील बुद्धिजीवी समाजात विठ्ठल यांना नेहमीच फार मानाचे स्थान होते. 

किसान सभेचे, पक्षाचे व डाव्या चळवळीचे नेतृत्व

विठ्ठल हे जन्माने शेतकरी कुटुंबातले. त्यामुळे शेतकरी चळवळीपासून आणि किसान सभेपासून ते कधीच दूर नव्हते. ते स्वतः लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील किसान सभेकडे जातीने लक्ष द्यायचे. दोन्ही जिल्ह्यांच्या किसान सभेच्या अधिवेशनांत व संघर्षांत ते हमखास आमच्यासोबत यायचे आणि उत्कृष्ट मार्गदर्शन करायचे. मी अनेकदा त्यांना म्हणायचो की, किसान सभेच्या राज्य पदाधिकाऱ्यांमध्ये तुम्ही असले पाहिजे, तुमच्या अनुभवाचा संघटनेला मोठा फायदा होईल. पण “मला खूप कामे आहेत हो, मला आहे तेथेच निवांत राहू द्या!” असे मिश्किलपणे म्हणत ते नेहमी माझा आग्रह टाळायचे. 

जे. पी. गावीत, किसन गुजर, डॉ. अजित नवले, मी व किसान सभेच्या इतर कार्यकर्त्यांना ते अनेकदा अनमोल सूचना द्यायचे. जून २०१७च्या महाराष्ट्रातील अभूतपूर्व संयुक्त शेतकरी संपापूर्वी त्यांनी केलेल्या मौल्यवान सूचनांची आम्हाला खूप मदत झाली. मार्च २०१८च्या नाशिक ते मुंबईच्या किसान सभा-प्रणित ऐतिहासिक किसान लॉंग मार्चच्या यशाबद्दल त्यांना फार मोठा अभिमान वाटला आणि सर्व कार्यकर्त्यांच्या मनःपूर्वक अभिनंदनाचा त्यांनी मला लगेच फोन केला.   

गेली ५० वर्षे विठ्ठल हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अत्यंत मौल्यवान आणि निष्ठावंत नेते होते. ते १९८५ पासून पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कमिटीचे सदस्य होते आणि २००५ पासून ते २०१२ पर्यंत पक्षाच्या महाराष्ट्र राज्य सचिवमंडळाचे सदस्य होते. २००५ ते २०१५ या काळात मी पक्षाचा महाराष्ट्र राज्य सचिव असताना प्रत्येक महत्त्वाच्या राजकीय-वैचारिक-संघटनात्मक प्रश्नावर त्यांनी मला केलेल्या अचूक आणि निरपेक्ष मार्गदर्शनाने पक्षाच्या हिताचे निर्णय घेण्यास मला खूप मदत झाली. प्रकृतीच्या कारणास्तव बैठकींना नियमितपणे हजर राहता येत नाही, म्हणून आम्हा सर्वांच्या ठाम विरोधाला न जुमानता ते राज्य कमिटीतून स्वतः निवृत्त झाले. पण ते अखेरपर्यंत राज्य कमिटीचे विशेष निमंत्रित सदस्य राहिले. पक्षाचे काम त्यांच्यासाठी सर्वोच्च असे आणि हे काम ते अखेरपर्यंत अविरत करतच राहिले. 

डाव्या आणि पुरोगामी शक्तींची एकजूट बळकट करणे हे त्यांचे अत्यंत महत्त्वाचे उद्दिष्ट असायचे, आणि त्यासाठी त्यांनी आयुष्यभर खूप कष्ट घेतले. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत आणि मराठवाड्यात सर्व डाव्या व पुरोगामी शक्तींना एकत्र करण्यात त्यांचा नेहमी पुढाकार असायचा. त्याचबरोबर धर्मांध आणि जातपातवादी शक्तींना त्यांचा नेहमीच कडवा विरोध असायचा.

मोलाचे वैचारिक योगदान

डॉ. विठ्ठल मोरे यांनी डाव्या चळवळीला दिलेले राजकीय-वैचारिक योगदानही तितकेच महत्त्वाचे होते. राज्यशास्त्राच्या पीएच. डी. साठी त्यांचा प्रबंधच मुळी “महाराष्ट्रातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका” या विषयावर होता. तोच प्रबंध अद्ययावत करून त्यांनी लिहिलेल्या “मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष – क्रांतीच्या दिशेने आगेकूच” या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या ‘जनशक्ती प्रकाशना’ने प्रसिद्ध केल्या आणि त्याच्या हजारो प्रती महाराष्ट्रात हातोहात विकल्या गेल्या. डॉ. मोईन शाकीर, डॉ. ज. रा. शिंदे यांसारखे विद्यापीठातील अतिशय नावाजलेले पुरोगामी प्राध्यापक त्यांचे मार्गदर्शक आणि सहकारी होते. “महाराष्ट्राचे शासन आणि राजकारण”, “जागतिकीकरण आणि त्याविरुद्धचा लढा”, “क्रांतिसूर्य भगतसिंग”, “प्रेमचंद यांचे साहित्य – एक मूल्यांकन”, “भागो नही, दुनिया बदलो – युवकांना आवाहन” अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली, आणि इतर अनेक पुस्तके संपादित केली.

‘जनशक्ती प्रकाशना’ने त्यांनी लिहिलेली आणखी दोन उत्तम पुस्तके प्रकाशित केली. एक होते कार्ल मार्क्सच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त २०१८ साली त्यांनी लिहिलेले “मार्क्स कोण होता?” हे पुस्तक. त्याचे प्रकाशन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व माजी खासदार कॉ. सीताराम येचुरी यांच्या हस्ते फेब्रुवारी २०१८ मध्ये पक्षाच्या सांगली येथील राज्य अधिवेशनात झाले. दुसरे होते दोन वर्षांपूर्वी कॉ. अप्पांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांनी लिहिलेले “कॉम्रेड गंगाधर अप्पा बुरांडे – मार्क्सवादी कर्मयोगी” हे पुस्तक. पक्षाचे राज्य सचिव व माजी आमदार कॉ. नरसय्या आडम यांच्या हस्ते झालेल्या या पुस्तकाच्या परळीतील प्रकाशन समारंभात आम्ही सर्व कार्यकर्ते हजर होतो. 

त्यांनी तिसरे पुस्तकही खूप परिश्रम घेऊन विठ्ठलरावांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या स्वतःच्या मृत्युच्या महिन्याभरापूर्वीच पूर्ण केले. ‘जनशक्ती प्रकाशना’तर्फे प्रकाशित होणाऱ्या त्या पुस्तकाचे नाव आहे, “कॉम्रेड विठ्ठलराव नाईक – एक संघर्षशील योद्धा”. विठ्ठल यांनी मला त्याची प्रस्तावना लिहिण्याचा आदेश दिला. तो मी पाळला आणि त्यांना ती प्रस्तावना आवडली याचे मनोमन समाधान आहे. पण हे पुस्तक प्रकाशित झालेले ते पाहू शकले नाहीत याची अतीव खंत वाटते. ते आता त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी उद्या लातूर जिल्ह्यात गांजूर या त्यांच्या गावी होत असलेल्या कार्यक्रमात प्रकाशित होत आहे. तसेच विठ्ठल यांच्याविषयीच्या आठवणींचे “माणूसवेडा कॉम्रेड” हे सुंदर पुस्तकही उद्या प्रकाशित होत आहे. उद्याच्या त्या कार्यक्रमाला हजर राहण्याची संधी मला मिळत असल्याबद्दल मनस्वी आनंद होत आहे. कॉ. गंगाधर अप्पा बुरांडे आणि कॉ. विठ्ठलराव नाईक या मराठवाड्यातील पक्षाच्या आणि डाव्या चळवळीच्या दोन्ही उत्तुंग स्वातंत्र्यसैनिक लोकनेत्यांचे जीवनकार्य लिहून विठ्ठल यांनी खूप मोलाची कामगिरी बजावली आहे.   

पक्षाचे साप्ताहिक मुखपत्र ‘जीवनमार्ग’चे ते अखेरपर्यंत संपादक मंडळ सदस्य राहिले आणि त्यात अनेक उद्बोधक लेख त्यांनी लिहिले. ‘क्रांतीज्योत’, ‘छात्र संघर्ष’, ‘युवा संघर्ष’, ‘विचार मंथन’, ‘शिक्षणविश्व’ अशा अनेक अनियतकालिकांचे विठ्ठल हे संपादक होते. एका उत्तम पत्रकाराची प्रतिभा त्यांच्याकडे होती.

विद्यापीठाचे सेनेट, व्यवस्थापन परिषद, विद्वत परिषद यांवर ते अनेकदा निवडून आले. राज्यशास्त्र अभ्यास मंडळ आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषद या महत्त्वाच्या संस्थांचे अध्यक्ष आणि संमेलनाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. औरंगाबाद, नांदेड, अमरावती, सोलापूर येथील विद्यापीठांच्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळांचे ते अनेक वर्षे अध्यक्ष व सदस्य राहिले. 

विठ्ठल हे अतिशय प्रभावी वक्ते होते. त्यांची ओजस्वी भाषणे श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. तसेच ते उत्कृष्ट अभ्यास शिबिरे घ्यायचे. मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात त्यांनी असंख्य शिबिरे घेतली. सोपी, साधी पण सखोल अशी शिबिरे घेण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या वैचारिक कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. वैचारिक क्षेत्रातील त्यांची उणीव आपल्या सर्वांना सर्वात जास्त तीव्रतेने भासत राहणार आहे.

एक उत्तम व्यक्ती

“फक्त चांगली व्यक्तीच चांगली कम्युनिस्ट बनू शकते”, अशी एक अचूक म्हण आहे. त्या बाबतीत विठ्ठल यांचा हात धरू शकणारे कमी जण आहेत. प्रेरणादायक, मनमिळाऊ, संयमी आणि प्रेमळ स्वभाव, सर्वांना हवेहवेसे वाटणारे पण त्याचबरोबर खडतर परिश्रम घेणारे आणि तत्त्वाबाबत खंबीर असणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या घरी राहण्याची, त्यांच्याशी अनेक विषयांवर मनमोकळी चर्चा करण्याची गेल्या चार दशकांत मला अनेकदा संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. त्यांच्याशी झालेल्या प्रत्येक भेटीनंतर उत्साह वाढत असे, नवीन उमेद तयार होत असे. त्यांच्यासोबतचे क्षण हा माझ्यासाठी आणि इतर सर्वच कार्यकर्त्यांसाठी एक अमोल ठेवा आहे. तो आपण सर्व जण नक्कीच चिरंतन जपून ठेवू.

त्यांचे सारे कुटुंब उच्चविद्याविभूषित आहे. कुसुमताई लग्नानंतर केवळ पुढे शिकल्या एवढेच नव्हे, तर त्यांनी पीएच.डी. पदवीही मिळवली, आणि प्राध्यापिका व पुढे प्राचार्य म्हणून अनेक वर्षे कार्य केले. त्याचबरोबर कुसुमताईंनी संसार सांभाळला आणि विठ्ठलना रखमाईची भक्कम साथ दिली. संग्राम व क्रांती, तसेच संजय आणि त्यांच्या इतर सर्व कुटुंबियांना विठ्ठल यांनी खूप प्रेम दिले आणि त्या सर्वांनीही विठ्ठल यांच्यावर तितक्याच प्रेमाचा वर्षाव केला.

आमच्यापैकी अनेकांची – एसएफआय च्या आजीमाजी परिवाराची – विठ्ठल यांची अखेरची भेट झाली ती ९ फेब्रुवारी २०२० रोजी मुंबईतील एसएफआय च्या संस्मरणीय सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या मेळाव्यात. तेव्हा प्रकृती बरी नसतानाही विठ्ठल मुद्दाम लातूरहून मुंबईला आले, त्यांच्या ‘बचपन की मोहब्बत’ असलेल्या संघटनेकरता, आणि डाव्या चळवळीच्या भवितव्याकरता. ते कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आणि त्यांचे सुंदर व ओजस्वी अध्यक्षीय भाषण आम्ही कोणीच कधी विसरणार नाही.

विठ्ठल जाऊन आज एक वर्ष झालं. अजूनही विश्वास बसत नाही. गेल्या वर्षभरात अनेकदा वाटलं, पूर्वीसारखाच त्यांचा फोन येईल, “काय अशोक, काय चाललंय?” हा त्यांचा मधुर स्वर कानावर पडेल. पण ते आता अर्थातच होणे नाही. त्यांच्या प्रेमळ आणि प्रेरणादायक आठवणी मनात साठवून त्यांच्या मार्गावरून निर्धाराने चालत राहणे हे मात्र आपल्या सर्वांच्याच हातात आहे.       

डॉ. अशोक ढवळे,

लेखक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य असून ते अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय