खोडीयार कंपनीचे मालक फरार !
राजकोट / रवींद्र कोल्हे : कोहिनूर या नामांकित आणि प्रसिद्ध आटा चक्की’चा लोगो वापरून बनावट आटा चक्क्या तयार करीत असल्याची अधिकृत माहिती मिळाल्यानंतर नारायणगाव पोलिसांनी गुजरात राज्यातील राजकोट येथील ‘खोडीयार मॅन्युफॅक्चर’ कंपनीवर छापा टाकला.
पोलिसांनी आटा चक्की बनविण्यासाठी लागणारे बनावट साहित्य जप्त केले. मात्र छापा पडल्याचे कळताच कंपनीचे मालक कंपनीतून पसार झाल्याची अनधिकृत माहिती हाती आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोहिनूर या नामांकित कंपनीचा ‘बनावट लोगो’ वापरून आटा चक्क्यांची विक्री करून ‘कॉपी राईट’ कायद्याचा भंग केल्याप्रकरणी नारायणगाव (ता.जुन्नर) येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नारायणगाव येथील विनोद सेल्स कॉर्पोरेशनचे मालक पराग अशोक शहा आणि सुहास अशोक शहा यांनी याबाबत नारायणगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार नारायणगाव पोलिसांनी प्रथम संबंधित बनावट चक्क्या जुन्नर आणि अकोला तालुक्यातून काही रिटेल विक्रेत्यांकडून सील केल्या.
त्यानंतर उत्पादन कोठे होते याची सविस्तर माहिती काढून वरिष्ठांना तपासाची कल्पना देऊन, त्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित बनावट चक्क्या तयार करून त्यांचा पुरवठा करणाऱ्या ‘जय खोडीयार मॅन्युफॅक्चर’ या कंपनीवर छापा टाकण्याची योजना आखली. त्यानुसार सोमवार(दि.२ ऑगस्ट ) रोजी गुजरात राज्यातील राजकोट येथील ‘जय खोडीयार मॅन्युफॅक्चर’ बंसारी चक्की या कंपनीवर छापा टाकून ‘आटा चक्की बनविण्यासाठी लागणारे बनावट साहित्य ताब्यात घेतले आहे.
मात्र कारवाई दरम्यान पोलिसांची नजर चुकवून ‘जय खोडीयार मॅन्युफॅक्चर’ कंपनीचे मालक शैलेश पदारिया व पुरुषोत्तम पदारिया पसार झाले.