भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये ( SNCU ) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. शनिवारच्या मध्यरात्री जवळपास दोन वाजता ही आग लागली असून 17 बालकांपैकी 7 बालकांना वाचवण्यात यश आले आहे, भंडारा जिल्हा शल्य चिकीत्सक प्रमोद खंडाते यांनी या घटनेची सविस्तर माहिती दिली.
शनिवारी रात्रीच्या दरम्यान अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बॉर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे ड्युटीवर असलेल्या नर्सला दिसून आले. त्यानंतर नर्सने दार उघडून बघितले असता त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता. त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले.
त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या SNCU मध्ये दोन युनिट आहेत यापैकी मॉनिटर रूममध्ये असलेल्या सात बालकांना वाचवण्यात यश आले तर आऊट बॉर्न युनिटमधील 10 बालकांचा मृत्यू झाला.
सिव्हिल सर्जन डॉ. प्रमोद खंडाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग मध्यरात्री 2 वाजता सिक न्यूबॉर्न केअर यूनिट (SNCU) मध्ये लागली. युनिटमधील 7 बालकांना सुखरूप वाचवण्यात आले असून 10 बालकांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी !
भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत सुमारे 10 बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी. असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
दरम्यान आपल्या नवजात चिमुकल्यांना गमावल्याने कुटुंबियांनी टाहो फोडला आहे. रुग्णालयाबाहेर लोकांची गर्दी झाली असून या घटनेची चौकशी करण्याची मागणी हे लोक करत आहेत. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे दहा बालकांचा नाहक बळी गेल्याचा आरोप काहींनी केला आहे.