मुंबई : कोरोना संकटामुळे राज्य अडचणीत असतानाही राज्यातील नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत शासनाने राज्यातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या संकटकाळात एका जबाबदार राजकीय पक्षाचा नेता आणि लोकप्रतिनिधी म्हणून राज्य सरकारच्या या कामात थोडीशी मदत म्हणून आपण आपल्या एक वर्षाच्या वेतनाची आणि काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांच्या एक महिन्याच्या वेतनाचे असे एकूण जवळपास 2 कोटी रुपये, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने 5 लक्ष रूपये आणि अमृत उद्योग समूह संगमनेरच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार असल्याची घोषणा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
रॉयलस्टोन निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधताना महसूलमंत्री थोरात म्हणाले की, देशात आणि राज्यात कोरोना संकटाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. वेगवान पद्धतीने आणि वेळेत सर्व नागरिकांचे लसीकरण करणे हाच कोरोनावरील सर्वोत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लावलेल्या निर्बंधामुळे उद्योग, व्यापारी आस्थापना बंद असल्याने अनेक राज्ये आर्थिक अडचणीत आहेत. शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन राज्यातील 18 वर्षावरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीही ५ लक्ष रुपयांची मदत करणार
सरकारच्या या निर्णयाचे काँग्रेस पक्षाने स्वागत केले असून कोरोना विरोधी लढ्याला बळ देण्यासाठी आपल्या परीने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, राज्य सरकारने घेतलेल्या मोफत लसीकरणाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी हातभार म्हणून विधानसभा सदस्य म्हणून माझ्या एक वर्षाच्या वेतनाची आणि काँग्रेस पक्षाच्या विधानसभा आणि विधानपरिषेतील 53 आमदारांच्या एका महिन्याच्या वेतनाची अशी एकूण जवळपास 2 कोटी रुपयांची रक्कम, तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने 5 लक्ष रुपये इतकी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
अमृत उद्योग समूह संगमनेरच्या ५ हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार
थोरात म्हणाले की, मी काही सहकारी संस्थांचे नेतृत्व करतो, अमृत उद्योग समुहातील या सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या खर्चाची रक्कम त्या सहकारी संस्था स्वीकारणार असून, त्यासाठी येणारा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात येणार आहे.
काही तरुण मंडळीही या विधायक कार्यात पुढाकार घेत आहेत. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी जे नागरिक लसीकरणाचा खर्च स्वतः उचलू शकतात त्यांनी लसीची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचे आवाहन केले आहे. तर मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक यांनी स्वतः आणि इतर पाच व्यक्तींच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे जाहीर केले आहे, त्यांच्या या भूमिकेचे मी कौतुक करतो.
कोरोना रूग्णांवरील उपचारांसाठी ऑक्सिजन, औषधे, वैद्यकीय उपकरणे अशा विविध गोष्टींची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेली ही मदत गरीब रूग्णांसाठी आवश्यक साम्रगी खरेदी करण्यासाठी उपयोगात येऊ शकते त्यामुळे राज्यातील इतर राजकीय पक्ष, सहकारी संस्था औद्योगिक आस्थापना यांनी आपल्या परीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करावी असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.