Friday, October 18, 2024
Homeग्रामीणआई मुक्ताई येणेरे रहिवासी सेवा संघाचा कौतुकास्पद उपक्रम, कोरडा शिधा एकत्र करून...

आई मुक्ताई येणेरे रहिवासी सेवा संघाचा कौतुकास्पद उपक्रम, कोरडा शिधा एकत्र करून वृद्धाश्रमास मदत

जुन्नर /आनंद कांबळे : येणेरे (ता. जुन्नर) येथे दरवर्षीप्रमाणे आई मुक्ताई ची यात्रा अत्यंत उत्साहात संपन्न झाली. परंतु यावर्षी आई मुक्ताई येणेरे रहिवासी सेवा संघाचे पुणे, मुंबई चे कार्यकर्ते एकत्र येऊन एक विज्ञाननिष्ठ संकल्प जाहीर केला. यात्रेच्या ८/१० दिवस अगोदर पत्रके छापून व ऑडिओ क्लिप तयार करून संपूर्ण गाव,परिसरात भावनिक आवाहन केले. आई मुक्ताई यात्रेनिमित्त “नैवेद्यरूपी कोरडा शिधा एकत्र करू, अन्नाची नासाडी थांबू व वृद्धाश्रमास मदत करू” असे आवाहन करण्यात आले.

पहिल्याच प्रयत्न असल्याने काहीसा मिश्र प्रतिसाद या उपक्रमास मिळाला. खरं म्हणजे जुन्या रूढी,परंपरा, प्रथा जोपासण्याकडेच लोकांचे जास्त लक्ष असते, भीतीपोटी मात्र त्याची अवहेलना कुणी करत नाही. अन्न हे पूर्णब्रह्म आहे हा विचार लोकांमध्ये रुजवून सद्यस्थितीत माणुसकी जपण्याचे स्वप्न या सेवा संघाच्या कार्यकर्त्याकडून बऱ्याच अंशी यशस्वी झालेलं पहावयास मिळालं. कोरडा शिधा ज्यामध्ये वेगवेगळी धान्य, डाळ, गुळ, तेल एकत्र करून जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी येथील राजाराम पाटील वृद्धाश्रमास देण्यात आले.

ही संकल्पना पूर्णत्वास घेऊन जाण्यास आई मुक्ताई येणारी रहिवासी सेवा संघातील मुंबईचे अध्यक्ष सुनिल घोगरे, उपाध्यक्ष भरत ढोले तर पुण्याचे अध्यक्ष रमेश ढोले,उपाध्यक्ष शिवाजी काळे, राजन ढोले, ए.पी.आय दत्ता ढोले, ईश्वर ढोले, मिलिंद ढोले,ज्ञानेश ढोले, राजेंद्र चासकर, अंकुश ढोले, रामभाऊ ढोले, जयकर ढोले,साधना ढोले, प्रमिला चौरे, राजश्री भुजबळ, मनीषा काळे, राजू ढोले, संतोष ढोले, याचबरोबर येणेरे व विठ्ठलवाडी चे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांनी खूप मेहनत घेतली.

दरवर्षी रितीरिवाजाप्रमाणे देवीला सात – दहा असे नैवेद्य देण्याची पद्धत आहे. परंतु नैवेद्याची नासाडी थांबऊन देवीला एक नैवेद्य दाखवून, कोरडा शिधा देण्याच्या आवाहनाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. यापूर्वी आई मुक्ताईपुढे बकऱ्यांचे बळी मोठ्या प्रमाणावर दिले जायचे, युवकांच्या नेतृत्वामुळे आता ती प्रथा पूर्णपणे बंद झाली आहे. अशाच प्रकारे अन्नाची नासाडी थांबून भविष्यात गरीब, निराधार, वंचित, लोकांना किंवा वृद्धाश्रमास मदत झाल्यास आई मुक्ताई चा आशीर्वाद निश्चित मिळेल असे मला वाटते. कोणतेही बदल पटकन होत नाही, याची आम्हाला कल्पना आहे.

– साधना ढोले,
महिला सदस्या,आई मुक्ताई येणेरे रहिवासी सेवा संघ.

संबंधित लेख

लोकप्रिय