सांगोला : भाई चंद्रकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार सांगोले यांना केंद्र सरकारने केलेले तीन कृषी विरोधी कायदे रद्द करावेत या मागणीला घेऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
नुकतेच केंद्र सरकारने शेतकरी विरोधी धोरण अवलंबत शेतकरी विरोधी कृषी कायदे संसदेत मंजुर केले आहेत. त्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना फार मोठा फटका बसणार आहे. केंद्र सरकारचे हे धोरण अक्षरशः शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे आहे. एकतर उत्पादन खर्चाच्या आधारे शेतकऱ्यांच्या मालाला किंमत नाही. उत्पन्नापेक्षा खर्च जादा होत असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच भर म्हणजे निसर्गाची अवकृपा झाली आहे. आसमानी संकटाबरोबर ह्या सुलतानी सरकारच्या संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारच्या ह्या शेतकरी विरोधी कृषी कायद्याचे पडसाद संपुर्ण देशामध्ये पहावयास मिळत आहेत. शेतकरी ह्या कायद्याला विरोध करण्यासाठी लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करताना पहावयास मिळत आहे. या कायद्या विरोधात असंतोष पहावयास मिळत आहे. अशी टीका यावेळी शेतकरी कामगार पक्षाने केंद्र सरकारवर केलेली आहे.
यावेळी अध्यक्ष दिपक गोडसे, नगरसेवक सुरेश माळी, नगरसेवक गजानन बनकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे लक्ष्मण माळी, रोहीदास चौगुले, शंकर माने, सचिन फुले, देवानंद कांबळे, सुब्राव बंडगर, नितेश बनसोडे उपस्थित होते.