मुंंबई : आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या प्रतिनिधींची, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासोबत बैठक संपन्न झाली. बैठकीत एकरकमी सेवा समाप्ती लाभाव्यतिरिक्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनाच्या निम्मी रक्कम मासिक पेन्शन स्वरूपात तहहयात देण्यात यावी, ही माागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
पेन्शनच्या मागणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कोविड काळातील व एकूणच कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून मासिक पेन्शन बाबत सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा केली. शासकीय व प्रशासकीय पातळीवरील प्रक्रियेसाठी काही वेळ लागेल परंतु महाविकास आघाडी सरकार अंगणवाडी सेविकांना न्याय देण्यासाठी आवश्यक ती पावले नक्की उचलेल अशी ग्वाही मंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिली.
थकित सेवासमाप्ती लाभ देण्यासाठी प्रशासकीय पातळीवरील प्रक्रिया पूर्ण होत आल्याचे त्यांनी सांगितले. इतर सर्व थकित देयकांबाबत प्रशासकीय पातळीवर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याचे त्यांनी मान्य केले. मदतनिसांची सेविका पदी थेट नियुक्ती, मोबाईल व ऑनलाईन काम आदी अन्य प्रश्नांवर पुढील आठवड्यात विभाग पातळीवर सविस्तर बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
बैठकीत कृती समितीच्या वतीने एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, नितीन पवार व सुवर्णा तळेकर सहभागी झाले होते. प्रशासनाच्या वतीने महिला व बालविकास विभागाचे सहसचिव जरांडे व एकात्मिक बालविकास सेवा योजना उपायुक्त श्रीमती नगरकर, क्षीरसागर, विशेष अधिकारी श्रीमती योगिनी सुर्वे हे उपस्थित होते.