Sunday, December 8, 2024
Homeग्रामीणसुरगाणा : उंबरदे पळसन परिसरात आढळले मृत अवस्थेत कावळे ; परिसरात खळबळ

सुरगाणा : उंबरदे पळसन परिसरात आढळले मृत अवस्थेत कावळे ; परिसरात खळबळ

सुरगाणा (गणेश चौधरी) : शहरापासून बारा ते पंधरा किलोमीटर अंतरावरील उंबरदे पळसन परिसरातील जंगलामध्ये आठ ते दहा कावळे मृतावस्थेत आढळून आल्याने बर्ड फ्लूच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

हा भाग अतिदुर्गम असून जंगलामध्ये ता.11 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास उंबरदे (प) या गावाजवळ काही कावळ्यांचा एका झाडावर गोंगाट  सुरु असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. नेमके कावळे का गोंगाट करत आहेत हे पाहण्यासाठी काही ग्रामस्थ गेले असता तेथे पाच ते सात कावळे मृतावस्थेत आढळून आले. गावातील काही मुलांनी खेळता खेळता हे कावळे उचलून नदीत फेकून दिले.

दरम्यान, काही सुजाण नागरिकांच्या लक्षात आलं की बर्ड फ्लूच्या संदर्भात शासना तर्फे प्रसार माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे की, जंगलातील पक्षी, किंवा पाळीव पक्षी मृत अवस्थेत आढळून आल्यास वनविभाग, पशुसंवर्धन अधिकारी,  तहसिलदार, गटविकास अधिकारी यांचेशी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले होते. हि बाब लक्षात घेऊन तात्काळ तहसिलदार विजय सुर्यवंशी, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, पशुधन विकास अधिकारी डॉ. ललिता नाळे, तालुका  वैद्यकीय अधिकारी डॉ. रणवीर, पोलिस निरीक्षक दिवानसिंग वसावे, तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी  सुरेश गवारे, यांनी तात्काळ दखल घेऊन कारवाई करत रात्री नऊ वाजता उंबरदे प येथे धाव घेऊन पशुधन अधिकारी डॉ. एम. एस. बि-हाडे, डॉ. एल. वाय. गायकवाड यांनी पाच कावळे ताब्यात घेतले असून त्यापैकी चार मृतावस्थेतील आहेत तर एक बेजार असून अर्धमेल्या अवस्थेतील आहे. कावळे ताब्यात घेणा-यांनी ग्रामस्थांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन केले आहे. 

“अतिदुर्गम भागातील उंबरदे पळसन येथे जाऊन मृतावस्थेत आढळलेले कावळे ताब्यात घेतले आहेत. ते पक्षी रोग अन्वेषण प्रयोगशाळा पुणे येथे नाशिक विभागीय प्रयोगशाळे तर्फे तपासणी करीता  पाठविण्यात येतील. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच खरे कारण समजू शकेल. तो पर्यंत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून जाऊ नये. पक्ष्यांमध्ये अनपेक्षित मरतुक आढळून आल्यास त्याची माहिती लपवून न ठेवता नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा. त्यामुळे भिती बाळगू नये. तसेच प्रशासना तर्फे योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.”

– डॉ. ललिता नाळे

– पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती सुरगाणा

कावळे मृत अवस्थेत आढळल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. याबाबतची तपासणी करून शासनाने नेमके मृत्युचे कारण स्पष्ट करुन वस्तूनिष्ठ माहिती द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

संबंधित लेख

लोकप्रिय