सुमारे बाराशे किलो अन्नधान्य वाटप (ALANDI)
आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील संत साई इंग्लिश मीडियम हायस्कूल, भोसरी या प्रशालेत “देण्यातील आनंद आणि समाधान” अर्थात Joy of Giving than receiving Week हा संस्कारक्षम परमार्थिक उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून राबविला जात आहे, सुमारे बाराशे किलो अन्नधान्य वाटप उत्साहात करण्यात आले. (ALANDI)
या सामाजिक बांधिलकीचे माध्यमातून शाळेतील विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या सहकार्यातून विविध प्रकारचे अन्नधान्य यात गहू, साखर, तांदूळ, चणाडाळ, तुरडाळ, पोहे, बाजरी, रवा, गूळ, तेल किराणा शक्य तेवढ्या प्रमाणात प्रत्येक विद्यार्थ्याच्या माध्यमातून शाळेत एकत्रित केला जातो. जमा झालेला किराणा आदी साहित्याची, किराणा वस्तूंची वर्गवारी करून समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल ,वंचित , अनाथ, गरजू, घटकांना तसेच सामाजिक संस्थांना निमंत्रित करून वाटप केले जाते.
या उपक्रमाचे यावर्षीही मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. यात किराणाचे सुयोग्य किट बनवून दान करण्यात आले. याही वर्षी सुमारे बाराशे किलो अन्नधान्य वाटप करण्यात आले.
या वर्षी आळंदीतील पार्थराज वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक संतोष महाराज राऊत, हिंजवडी गावातील साखरे वस्ती येथील माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष माऊली सावंत, दिघी गावातील जीवन विद्या परिवर्तन ट्रस्ट संचलित स्नेहछाया परिवारचे संस्थापक प्रा. दत्तात्रय इंगळे, आळंदी येथील ज्ञानदीप वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह .भ. प. वसंत सोमवंशी, भक्तियोग आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप प्रकाश खतोडे महाराज, तसेच भक्तीयोग ज्ञानराज गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुकाराम कुरकुटे महाराज या सर्व समाजासाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांना आमंत्रित करून प्रत्येकी १७० किलो अन्नधान्य दिवाळी निमित्त सुपूर्द करण्यात आले.
यावेळी सर्वच संस्थांच्या मान्यवर व्यक्तींनी कृतज्ञता पूर्वक मनोगते व्यक्त केले. मान्यवरांनी विचार व्यक्त करताना आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे आपण काही देणे लागतो याचे भान ठेवणे म्हणजे दान असे मत व्यक्त केले. (ALANDI)
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवलिंग ढवळेश्वर म्हणाले, दानाचा दुसरा अर्थ म्हणजे स्वार्थाचा त्याग करणे आणि परोपकाराचे आत्मिक समाधान होय. संस्थेच्या ज्ञानदाना बरोबर इतरही संस्कारक्षम उपक्रमाचे यथायोग्य मार्गदर्शन यावेळी संस्थेचे पालक प्रतिनिधी इंजि.अजित मेदनकर यांनी करताना “देणाऱ्याने देत जावे ,घेणाऱ्याने घेत जावे ,घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे” या कविवर्य विं.दा .करंदीकर यांच्या ओळी गाऊन दाखवल्या. (ALANDI)
निसर्ग सुद्धा काहीही गाजावाजा न करता हवा, पाणी ,प्रकाश आपणाला मोफत देऊन दानरूपी महान कर्मच नित्य नियमाने करीत असल्याचे समर्पक उदाहरण देऊन मनोगत त्यांनी व्यक्त केले.
हरिभक्त परायण तुकाराम कुरकुटे महाराज यांनी संस्थे विषयी कृतज्ञता पूर्वक विचार व्यक्त करताना संस्थेचे आभार मानले. संस्थेच्या कार्याबद्दल मनोमन विचार व्यक्त करताना विद्यार्थ्यांवर होत असलेल्या परमार्थिक तसेच शैक्षणिक संस्कारांचे मनापासून कौतुक केले.
“देण्यातील आनंद आणि समाधान” “या सप्ताहाचे नियोजन करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष ढवळेश्वर, शाळेच्या संचालिका सुनीता ढवळेश्वर, उपमुख्याध्यापिका रूपाली खोल्लम, स्वाती मोघे, भारती ढवळेश्वर, मनोज वाबळे, प्रमोद शिंदे, काशिनाथ कत्नाळी तसेच शिक्षक पालक संघाचे प्रतिनिधी म्हणून सविता दाते, मेघा पाटील, गायत्री देवकर, झहिदा मोकाशी, आणि स्वयंसेवक विद्यार्थी यांचे योगदान मिळाले.