(जुन्नर) :- गेली अनेक वर्षांपासून जुन्नरच्या आदिवासी भागातील अनेक गावांमधील विजेची दुरावस्था पाहायला मिळत आहे. त्यामध्ये या वर्षी 3 जून 2020 रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे भर पडली आणि आंबे व पिंपरवाडी येथील विद्युत ट्रान्सफॉर्मरची मोठ्या प्रमाणावर मोडतोड झाली होती त्यावेळी दुरुस्तीची मागणी केली होती.
आंबे येथील विद्युत ट्रान्सफॉर्मरचे सुरक्षा कवच उडुन गेल्याने सर्व फ्यूज उघडे पडले आहेत. पिंपरवाड़ी येथील विद्युत ट्रान्सफॉर्मर गावातच म्हणजे घरांपासुन अगदी 6 फुटाच्या अंतरावर आहे. या ठिकाणी लहान मुले, वृद्ध, व जनावरांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. या ठिकाणी जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे पिंपरवाडी येथील विद्युत ट्रान्सफॉर्मर सुरक्षित स्थळी हलवावा अशी मागणी काही दिवसांपूर्वी केली होती त्या मागणीला मंजुरी मिळाली असून तूर्तास काम चालू झाले आहे.
आंबे येथील विद्युत ट्रान्सफॉर्मरची अवस्था अतिशय दयनीय असून जीवितहानी होण्याचा धोखा उद्भवू शकतो. त्यामुळे तेथील ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती तात्काळ करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी जुन्नर यांनी या दोन्ही कामांना मंजुरी दिली असून लवकरच ही कामे पूर्ण होतील असे आंबे पिंपरवाडीचे सरपंच मुकुंद घोडे यांनी सांगितले आहे.
यासाठी ग्रामपंचायत सदस्या रंजना घोडे व मीरा डगळे पिंपरवाडीचे पोलीस पाटील विष्णू घोडे, ग्रामस्थ शैलेश डगळे, ग्रामरोजगार सेवक संदीप शेळकंदे व DYFI चे गणपत घोडे यांनी सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.