नाशिक : कोरोना रुग्णांना सचविधि उपलब्ध करून देण्याची मागणी डाव्या पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याकडे करण्यात आली. नाशिक शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. याबाबत माकप नेते डॉ. डी. एल. कराड, शेतकरी कामगार पक्ष नेते माजी उपमहापौर ऍड. मनीष बस्ते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिवमंडळ सदस्य राजू देसले, माजी नगरसेवक ऍड. तानाजी जायभावे आदींंनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची भेट घेऊन कोरोना रुग्ण संख्या व वैद्यकीय अडचणीबाबत चर्चा केली.
मांढरे यांनी प्रशासन करत असलेल्या उपाय योजना ची माहिती दिली. व समाजातील घटकांनी या काळात अधिक मदत करावी. जनतेने घाबरून जाऊ नये. मनपा व जिल्हा प्रशासन, शासकीय रुग्णालय संपर्क साधावा, असे प्रतिपादन केले. डावे पक्ष व किसान सभा, कामगार संघटना करत असलेल्या मदत कार्याबाबत माहिती दिली. शिष्टमंडळाने शासकीय रुग्णालय नाशिक येथे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निखिल सैदाने यांची भेट घेऊन अडचणीबाबत विचारविनिमय केला व मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याशी चर्चा करून नाशिक शहरात असलेल्या परिस्थिती बाबत जलद गतीने निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी अशी विनंती केली
तसेच कोरोना रुग्णांना अत्यवस्थ झाल्यास जे इंजेक्शन द्यावे लागतात ते अत्यंत महागडे आहेत गरीब व मध्यम वर्गातील रुग्णांना इंजेक्शन बाहेरून घेणे परवडत नाही. तरी कोरोना आजारावर उपचारासाठी लागणारे औषधे व वर नमूद केलेले इंजेक्शन्स शासनातर्फे व महापालिकेच्यावतीने मोफत उपलब्ध करून देण्यात यावेत, कोरोना विषाणूचा फैलाव लक्षात घेता रुग्णांसाठी बेडची उपलब्धता संख्या वाढविण्यात यावी, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, आशा गेल्या ३ महिन्यापासून अथक परिश्रम घेत आहेत, त्यांच्या मदतीला त्वरित कर्मचारी भरती करण्यात यावी.
कोरोना रुग्ण व नातेवाईकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे, तसेच हॉस्पिटलच्या उपचाराबाबत संभ्रम आहे याबाबत जनतेला योग्य पद्धतीने माहिती मिळावी, यासाठीची हेल्पलाइन अधिक सक्षम करण्यात यावी, मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी पुरेशा संख्येने सुरक्षा साधनांसह कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावेत, भविष्यात वाढणारी रुग्णांची संख्या लक्षात घेता खाजगी हॉस्पिटल्स, हॉटेल्स सरकारने अधिग्रहित करावीत व हॉटेल, हॉस्पिटल व्यवसायिकांना त्याचा मोबदला देण्यात यावा, आदी मागण्या करण्यात आल्या.