मुरबाड (प्रतिनीधी) : ठाणे जिल्हातील मुरबाड तालुक्यामधील धसई या बाजारपेठेतील व्यापारी, आसपासच्या आदिवासी बहुल सर्वसामान्य ग्राहकांची करोना टाळेबंद काळात चढ्या भावाने वस्तू, किराणा सामाची विक्री करून, जनसामान्यांची लूट करीत असल्याबाबत तक्रार तहसिलदार यांच्याकडे बिरसा क्रांती दल, मुरबाडच्या वतीने करण्यात आली आहे.
धसई ही बाजारपेठ आदिवासी बहुल लोकवस्ती असलेली बाजारपेठ आहे. सदर बाजारपेठेवर धसईसह आसपासचे सुमारे ८० ते ९० आदिवासी वाड्या, खेडे, पाडे अवलंबून आहेत. जगासह देशात कोरोना महामारीचे संकट उभे असताना आणि कोणताही व्यापारी बाजारभावापेक्षा चढ्या भावाने आपल्याकडील वस्तूंची विक्री करणार नाही. शासनचे असे स्पष्ट आदेश असताना, सदर बाजारपेठेत जाणुन बुजून सर्वसामान्य आदिवासी जनतेच्या मजबुरीचा फायदा उठवून बिनदिक्कतपणे सदर बाजारपेठेतील व्यापारी चढ्या भावाने वस्तूंची विक्री करताना निदर्शनास येत असल्याचे बिकेडीचे म्हणणे आहे.
बाजार भावाविषयी दुकांदारासोबत बोलले असता ते म्हणतात, माल मिळत नाही; म्हणून बाजारभाव जास्त आहे. तुम्हाला घ्यायचे असेल तर घ्या नाहीतर नका घेऊ! अशी अरेरावी भाषाही काही व्यापाऱ्यांची झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. टाळेबंद काळात आदिवासी बांधवाना रोजगार नसल्यामुळे व सदर बाजारपेठेतील नफेखोरीसाठी बाजारभाव वाढवून सदर बाजारपेठेतील धनदांडगे लुटण्याचे काम करत असल्याचे बिकेडीने सांगितले.
ज्या प्रमाणे शासनाने दरफलक जाहीर केला आहे.त्याप्रमाणे वस्तूंचा दर व्यापाऱ्यांनी लावणे अपेक्षित आहे. याबाबत नियमांचे पालन व्यापारी वर्ग नियमांचे उल्लंघन करतानाच दिसतो. अशांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा प्रशासनाचा आदेश असताना, सदर प्रशासकीय आदेशाला व्यापाऱ्यांकडून फाट्यावर मारले जात आहे. अशा व्यापाऱ्यांच्या कृत्या बाबत प्रशासनाने वेळीच लक्ष घालणे गरजेचे आहे.प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सदर बाजारपेठेमध्ये तोतया गिऱ्हाईक बनून जाऊन, सदर बाबीचा पर्दाफाश करून कारवाई करणे अपेक्षित आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासनाकडून शासकीय दरपत्रकाचे होर्डिंग जनजागृतीस्तव बाजारपेठेत दर्शनीय ठिकाणी लावून, त्या बाजारभावानेच ग्राहकांनी घरेदी करावी, असे आव्हान करावे, अशी मागणी केली आहे.
यावेळी ठाणे जिल्हा कार्यध्यक्षा संध्याताई जंगले, अध्यक्ष तुकाराम रडे, सचिव मधुकर पादीर, उपाध्यक्ष दिलीप शिदे, महासचिव दिनेश नंदकर, रविंद्र आंबवणे, संजय घुटे, तुकाराम वाघ, काकाजी वाघ, छगन वाघ आदी उपस्थित होते.