वनसंवर्धन करणे ही काळाची गरज .
२३ जुलै हा दिवस भारतात ‘वनसंवर्धन दिन’ म्हणून साजरा केला जातो. अधिकाधिक जनजागृती करून वृक्ष लागवड करणे. त्यांचे संरक्षण, संवर्धन करण्याचा संकल्प दिवस. दिवसेंदिवस वाढणारे शहरीकरण, औदयोगिकीकरण, लोकसंख्या विस्फोट, वाढती मानवी गरजा, रेल्वे मार्ग, नवीन रस्ते महामार्ग विकास, शेतीसाठी वनक्षेत्रावरील अतिक्रमणे, आणि इतर काही विकास प्रकल्पामुळे वनसंपदेचा ऱ्हास होत आहे. विकासाच्या नावावर मोठया प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. त्याचा परिणाम पर्यावरणावर होऊन आज अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे.
तापमानाची समस्या, प्राण्यांच्या अनेक जाती व उपजाती पशू-पक्षी नष्ट होण्याच्या धोका निर्माण झाला आहे. पावसाचे प्रमाण कमी झाले, ऐनवेळी पाऊस, दुष्काळाचे प्रमाण वाढले, हवेचे प्रदूषण, हिमनद्या विरघळत आहेत, समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे, वाढती जमिनीची धूप या संकटांना आपणच आमंत्रण देत आहोत.
आजच्या काळात पर्यावरण समतोल राखायचा असेल तर वृक्ष लागवड आणि वनसंवर्धन करून पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे. तापमान वाढ व पर्यावरणाच्या समतोल राखण्यासाठी एकूण भूभागापैकी 33 टक्के वनक्षेत्र असणे आवश्यक आहे. धरतीमातेने मानवाला दिलेली मौल्यवान खजिना म्हणजे वनसंपदा. वनामुळे जमिनीची धूप रोखली जाते, पावसाचे पडलेले पाणी अडवणूक होऊन जमिनीत मुरते, पूर-दुष्काळ यासारख्या आपत्ती रोखण्यात मदत होते, पालापाचोळयाची भर टाकून जमिनीचा कस वाढविते, मानवाला ऑक्सिजनचा पुरवठा करून कार्बनडाय-ऑक्स।ईडचा नाश करते, वनापासून फुले-फळे, औषधे, थंडगार सावली, जनावरांसाठी चारा, मसाले, जळणासाठी, निरनिराळ्या वस्तू बनविण्यासाठी, घरे बांधण्यासाठी लाकूड मिळते.
दरवर्षी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा उपक्रम राबविला जातो. प्रत्येकवर्षी जी झाडे लावली जातात. ती जगविण्यासाठी अधिक प्रयत्न झाला पाहिजे. नाहीतर, त्याच खड्डात पुन्हा वृक्षारोपण केले जातात. “जैसे थे स्थिती” न करता मुलांप्रमाणे झाडांची ही काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्यकांने किमान पाच झाडे लावली पाहिजे. कारण, माणूस वनाशिवाय जगूच शकत नाही. वृक्ष ही निसर्ग व पर्यावरणाची फुफ्फुसे आहेत. यामुळे वृक्ष व वनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जेवढे जंगले जास्त तेवढे जगण्याचे आनंद जास्त असतो. वृक्ष जगतील तरच आपण जगू हे लक्षात ठेवले पाहिजे. स्वतःला वाचविण्यासाठी, भावीपिढीसाठी व समतोल पर्यावरणासाठी झाडे लावणे आणि वनसंवर्धन करणे खूप गरजेचे आहे.आपली धरतीमाता सदाहरित ठेवण्यासाठी या वनसंवर्धन दिनानिमित्ताने संकल्प करूया.
राजेंद्र पाडवी, तळोदा
९६७३६६१०६०