जुन्नर : जुन्नर तालुक्यातील आंबे – पिंपरवाडी घाटातील दुरवस्था झाली असून जर पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यास अनेक गावांचा तालुक्याशी असणारा संपर्क तुटू शकतो, अशी भीती ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.
आंबे गावचे सरपंच मुकुंद घोडे यांनी यापूर्वी आंबे घाटातील मोरी दुरुस्त करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन दिले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोरी दुरुस्त करण्यात आली खरी पण गटारीचे काम अपूर्णच राहिले गेले. त्यावेळी हि गोष्ट ग्रामस्थांनी बांधकाम विभागाच्या लक्षात आणून दिली होती, पण याकडे दुर्लक्ष केले गेल्यामुळे सध्या पावसाळयात अधिक प्रमाणात पाऊस झाल्यास रस्ता तुटण्याची शक्यता सामाजिक कार्यकर्ते गणपत घोडे यांनी “महाराष्ट्र जनभूमी”शी बोलताना व्यक्त केली.
हा रस्ता पावसामुळे तुटल्यास वाहतूक ठप्प होऊन पठार भागातील सुकाळवेढे, पिंपरवाडी, आंबे – हातवीज या गावाचा जुन्नर तालुक्याशी व शहराशी असणारा संपर्क तुटू शकतो अशी भीती ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.
या बाबतचे देखील निवेदन ग्रामस्थांच्या वतीने सरपंच मुकुंद घोडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही .