पैठण (ता.२४) : आज पैठण शहरात खरेदी करण्यासाठी नागरिकांनी तुंबळ गर्दी केली. शुक्रवार हा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने शहरातील नागरिकां बरोबरच ग्रामीण भागातील नागरिकही शहरात आले होते. त्यामुळे शहरात सकाळ पासूनच गर्दीचा ओघ सुरू होता.
शहरातील मुख्य बाजारपेठेत नागरिकांनी खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. मात्र यावेळी शारीरिक अंतर राखण्याला नागरिकांनी हरताळ फासल्याचं दिसत होतं. अनेकांनी तर चेहऱ्यावर मास्क किंवा रूमालही बांधलेला नाही. औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.
नागरिकांनी नियमांचे पालन करावे, गरज नसताना घराच्या बाहेर पडू नये असे प्रशासनाकडून वारंवार सहकार्याचे आवाहन केले जात आहे. तरीही नागरिकांकडून खरेदी करण्यासाठी अश्या प्रकारे गर्दी होत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
पैठण शहर आणि तालुक्यातही रुग्ण संख्या वाढत आहे. अश्या परिस्थितीत नागरिकांकडून होत असलेल्या हलगर्जीपणामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.