पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.23- निगडी प्राधिकरणातील प्रा.डॉ.हेमंत देवकुळे यांनी नॅनो पार्टिकल टेक्नॉलॉजी (अतिसूक्ष्म तंत्रज्ञान) चा वापर करून निर्माण केलेल्या कर्करोगावर वैद्यकीय उपचार करणाऱ्या उपकरणाला भारत सरकारच्या पेटंट (अधिहक्क) कार्यालयाने प्रमाणपत्र प्रदान करून नुकतीच मान्यता दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना प्रा.डॉ.हेमंत देवकुळे यांनी सांगितले की, माझ्या सात सहकाऱ्यांच्या साहाय्याने अनेक दिवसांपासून केलेल्या अथक परिश्रम आणि चाचण्यांमधून आम्हाला हे यश प्राप्त झाले आहे. या वैद्यकीय उपकरणामुळे शरीरातील कर्करोगाच्या पेशींचा अचूक वेध घेऊन औषधोपचार करणे सुलभ झाले आहे.त्यामुळे कर्करोगाने बाधित झालेल्या ठिकाणी नेमकेपणाने उपचार केला जाऊन त्याच्या आजूबाजूला असलेल्या निरोगी पेशींची हानी टाळता येते. याशिवाय आवश्यक आणि योग्य प्रमाणात औषधोपचार करता येतो.