Saturday, December 28, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडअवकाळी पावसाने आंदर मावळात भातपिकाचे नुकसान

अवकाळी पावसाने आंदर मावळात भातपिकाचे नुकसान

मावळ/क्रांतिकुमार कडुलकर:आंदर मावळातील कुसवली, खांडी, सावळा, वडेश्वर,बोरोली,कळकराई,नागाथली, वहाणगाव, खांडी, माळेगाव, कशाळ, कल्हाट,निगडे ईई अतिदुर्गम भागातील भाताची काढणी सुरु आहे. मात्र सलग तीन दिवसाचे ढगाळ हवामान आणि सुरू असलेल्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या भातमळ्यांचे नुकसान झाले आहे. भात पिकाबरोबर नुकतीच पेरणी केलेल्या कडधान्य गहू, हरभरा, वाटाणा, ज्वारी आदी रब्बी पिकांचेही नुकसान झाले आहे. दिवाळी पासून बहरलेल्या इंद्रायणी तांदुळाचे भात पिकाचे नुकसान झाले आहे. जगप्रसिद्ध इंद्रायणी तांदूळ हे मावळभागातील प्रमुख पीक आहे.भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदळाला जगभर मागणी असते. मावळातील इंद्रायणी तांदळाची चव ही बासमतीपेक्षाही चविष्ट असून ते आरोग्यदायी आहे.



गणपतीच्या आगमनापासून वरुणराजाने दिलासा दिला होता, त्यामुळे शेतातील पिके तरारली होती,दसरा दिवाळीनंतर बळीराजाचा चेहराही आनंदाने खुलून गेला. भात पिकाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने भात पीकही मोठ्या जोमात आले होते. मावळमध्ये इंद्रायणी तांदळाची ८५ टक्के लागवड केली जाते,भात कापणी,झोडपणी झाल्यावर भात गिरणी मध्ये भरडण्यासाठी शेतकरी देतात. कापणी नंतर दोन दिवस उन्हात ठेवल्यावर मोळ्यांची झोडपाणी हे कष्टाचे काम असते.

मावळ येथील शेतकरी योगेश गोंटे यांनी सांगितले की,शेकडो मजुरांनी कापणी करून मोळ्या प्लास्टिकच्या कापडानी झाकून ठेवल्या आहेत,आता ढगाळ हवामान,पावसाच्या भीतीने भातकापणी करून इंद्रायणीच्या तांदळाचा घास वाचवायचा प्रयत्न सुरू आहे. कडक ऊन पडल्याशिवाय बहरुन आलेली भातपिके हाती लागणार नाहीत.वर्षभर ज्या पिकाच्या भरवशावर अवलंबून राहावे, त्याच पिकाच्या ऐन काढणीवेळी अवकाळीचा फेरा आल्याने शेतकरी मोठा चिंतेच्या खाईत सापडला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय