Thursday, December 26, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्टाचा प्रगल्भ वसा आणि वारसा पुढे नेला पाहिजे, बॅ.नाथ पै व्याख्यानमालेत प्रसाद...

महाराष्टाचा प्रगल्भ वसा आणि वारसा पुढे नेला पाहिजे, बॅ.नाथ पै व्याख्यानमालेत प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

इचलकरंजी : महाराष्ट्राला प्राचीन, मध्ययुगीन काळातील संत चळवळीपासून हे अर्वाचीन काळातील समाज सुधारकांपर्यन्त मोठी वैचारिक परंपरा आहे. अनेक शतकांचा  प्रबोधन चळवळीचा विवेकवादी उज्वल इतिहास आहे. तसेच शिवरायांपासून शाहूराजांच्या राजेशाहीतही सर्वार्थाने लोकशाही जपणारी रयतेच्या कल्याणाच्या राज्यकारभाराचे लोककल्याणकारी राजकारण आहे. हा अतिशय प्रगल्भ स्वरूपाच्या वसा आणि वारसा आपण जपला पाहिजे. यातून योग्य तो बोध घेऊन पुरोगामी विचारधारेशी बांधिलकी असलेल्या प्रत्येकाने प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष सहकार्य करत पुरोगामी चळवळ एक दिलाने पुढे नेली पाहिजे ही महाराष्ट्राच्या एकसष्ठी पूर्तीची मागणी आहे असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस आणि ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती’ मासिकाचे संपादक प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. 

ते बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण या संस्थेच्या  ऑनलाईन व्याख्यानमालेत ‘पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल’ या विषयावर बोलत होते.महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हे व्याख्यान आयोजित केले होते.प्रारंभी संस्थेचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष ऍड.देवदत्त परूळेकर यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला.

प्रसाद कुलकर्णी यांनी सव्वा तासाच्या आपल्या ओघवत्या शैलीतील व्याख्यानात  महाराष्ट्राचा इतिहास, संत चळवळ, समाजसुधारक, भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील महाराष्टाचा सहभाग, द्विभाषिक राज्य, महाराष्टाची स्थापना, महाराष्ट्र स्थापनेवेळी निश्चित केलेली मार्गदर्शक सूत्रे, महाराष्टाचे राजकीय नेतृत्व, गेल्या एकसष्ठ वर्षातील महाराष्ट्राची सामाजिक-आर्थिक-राजकीय-सांस्कृतिक वाटचाल व त्यातील प्रश्न, विचारवंतांच्या हत्या, आज महाराष्ट्रासमोर शेतीपासून सहकारापर्यतचे आणि शिक्षणापासून ते आरोग्यापर्यंत असलेले प्रश्न, भविष्याची दिशा, आणि महाराष्टाचा भारतीय संदर्भ  अशा विविध मुद्यांचा अनेक उदाहरणे देत परामर्ष घेतला. संस्थेचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे यांनी आभार मानले.अरविंद परुळेकर यांनी सूत्र संचालन केले.

संबंधित लेख

लोकप्रिय