Wednesday, May 1, 2024
Homeकृषीतामिळनाडू तून हजारो शेतकरी ट्रेनने येऊन दिल्लीच्या किसान आंदोलनात सामील !

तामिळनाडू तून हजारो शेतकरी ट्रेनने येऊन दिल्लीच्या किसान आंदोलनात सामील !

नवी दिल्ली : ५ ऑगस्ट रोजी तामिळनाडूतून किसान सभेच्या नेतृत्वाखाली सुमारे १,००० शेतकरी दिल्लीच्या देशव्यापी किसान आंदोलनात सहभाग घेण्यासाठी सिंघू सीमेवर दाखल झाले. त्यात सुमारे ५० शेतकरी महिला सुद्धा होत्या. 

तामिळनाडू हे भारताच्या सर्वात दक्षिणेस असलेले राज्य. सुमारे ३,००० किलोमीटरचा ट्रेनने प्रवास करून ते नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचले. त्यांचे नेतृत्व किसान सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष के. बालकृष्णन, राज्य सरचिटणीस पी. शण्मुघम, राज्य अध्यक्ष व्ही. सुब्रमणी, राज्य कोषाध्यक्ष के. पेरूमल आणि अखिल भारतीय ऊस उत्पादक शेतकरी फेडरेशनचे अध्यक्ष डी. रवींद्रन यांनी केले. 

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर किसान सभेचे सरचिटणीस हनन मोल्ला, अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, सहसचिव एन. के. शुक्ला, विजू कृष्णन व बादल सरोज, कोषाध्यक्ष पी. कृष्णप्रसाद, शेतमजूर युनियनचे सरचिटणीस बी. वेंकट, सहसचिव विक्रम सिंह व खासदार व्ही. शिवदासन, सीटूचे सचिव करुमालयन, तामिळनाडूचे माकपचे लोकसभेतील खासदार एस. वेंकटेशन व पी. आर. नटराजन यांनी त्यांचे स्वागत केले.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून किसान सभेचे शेकडो लाल झेंडे घेतलेला शेतकऱ्यांचा मोर्चा भाजपच्या मोदी सरकारविरुद्ध जोरदार घोषणा देत निघाला. पोलिसांनी अडवल्यावर तेथे सर्व नेत्यांची भाषणे झाली. तामिळनाडूच्या शेतकऱ्यांच्या ज्वलंत स्थानिक प्रश्नांवर निवेदन राष्ट्रपतींच्या कार्यालयात देण्यात आले. 

त्यानंतर हे सर्व शेतकरी दिल्लीच्या सिंघू सीमेकडे रवाना झाले. ते ७ – ८ दिवस तेथेच मुक्काम करतील, असेही सांगण्यात आले.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय