मंचर : पिंपळगाव खडकी मधला मळा या ठिकाणी कैलासवासी गीताराम दशरथ बांगर यांच्या विहिरीमध्ये रात्री बिबट्या पडला. सकाळी आठ वाजता संतोष बबन बांगर हे विहिरीवरील विद्युत मोटार चालू करायला गेले असताना बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज त्यांना आला. त्यावेळी त्यांनी विहिरीत डोकावून पाहिली तेव्हा त्यांना विहिरीत बिबट्या विद्युत मोटारीच्या गडावर बसलेला दिसला. त्यानंतर त्यांनी वन विभागास ही माहिती दिली.
वनविभागाचे रेस्क्यू टीम त्या ठिकाणी आली व ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. या ठिकाणी बघ्याची प्रचंड प्रमाणात गर्दी झाली होती.
बिबट्याच्या संदर्भामध्ये प्रचंड दहशत या भागामध्ये आहे. वनविभागाने व शासनाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, नाहीतर या भागातील लोकांना जीवन जगणे अवघड होऊन बसेल. शेती करणे देखील शेतकऱ्यांना अवघड झाले आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर सांगितले.