पिंपरी : ऑल महाराष्ट्र शॉपकीपर फेडरेशनचे राज्यस्तरीय अध्यक्ष गजानन बाबर यांची ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशन या संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. तसे पत्र त्यांना संघटनेकडून नुकतेच प्रदान करण्यात आले आहे.
दिल्लीस्थित ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनचे देशभरात मोठे जाळे विस्तारलेले आहे. ऑल महाराष्ट्र शॉपकीपर फेडरेशनच्या माध्यमातून गजानन बाबर यांनी राज्यातील सर्व रेशनीग दुकानदारांची एकत्रित मोट बांधून त्यांना न्यायहक्क मिळवून दिले आहेत. कोरोना संकटाच्या काळात रेशन दुकानदारांना विमा संरक्षण कवच व आदी मागण्यांसाठी त्यांनी उभारलेल्या मोठ्या लढ्याची शासनाला देखील दखल घ्यावी लागली होती. दुकानदारांच्या रास्त मागण्यांना देशपातळीवर हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी त्यांच्यातील लढाऊ बाणा हेरूनच त्यांची संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्रात म्हटले आहे.
गजानन बाबर यांनी पिंपरी-चिंचवड येथे शिवसेनेची पहिली शाखा स्थापन केली होती. त्यानंतर त्यांनी आमदारकीदेखील भूषविली आहे. २००९ साली शिवसेनेच्या तिकीटावर ते मावळचे खासदार देखील झाले होते. आतादेखील ते चळवळीत अग्रस्थानी असतात. देशपातळीवरील संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षपदी एका मराठी माणसाची निवड झाल्याने त्यांच्यावर राज्यभरातील सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
– क्रांतिकुमार कडुलकर