Friday, December 27, 2024
Homeआंबेगावपुणे : आदिवासी ठाकरवस्तीकडे जाणारा रस्ता अडवल्याने आदिवासी मुलांची शाळा झाली बंद

पुणे : आदिवासी ठाकरवस्तीकडे जाणारा रस्ता अडवल्याने आदिवासी मुलांची शाळा झाली बंद

घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील चास येथील माचीचीवाडी – कोंबडवाडी या ठाकरवाडी कडे जाण्यासाठी अद्याप रस्ता नाही. या ठाकरवस्तीकडे जाणारी एक पाऊलवाट होती. पण ही पाऊलवाट ज्या जमिनीतून जात होती. त्या जमिनीची मालकी असणाऱ्या काही व्यक्तींनी गेल्या दोन दिवसांपासून ही पाऊलवाट काट्या टाकून बंद केली आहे.

साधारणतः 30 घरांचे आणि 125 लोकसंख्येच्या या आदिवासी ठाकर बांधवांचे सर्व दळणवळण थांबले आहे, मुलांना शाळेत जायला, लोकांना बाजारात, दवाखान्यात, ग्रामपंचायत मध्ये व इतरत्र कुठेही जाण्यासाठी दुसरा कोणताच रस्ता नसल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.

या आधीही अनेक वेळा अशाप्रकारे रस्ता आडवणे, बांधावरून जाणाऱ्या लोकांना धमकावणे असे प्रकार सुरू असल्याने संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाला या अगोदरही पत्र दिले होते. परंतु हे प्रकार थांबले नाही, व आता मागील दोन दिवस सदरील वस्तीचा रस्ता बंद झाल्याने, आदिवासी बांधवांची मोठी परवड झाली. या पार्श्वभूमीवर सदरील आदिवासी ठाकर बांधवानी, लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू करणार असल्याचे निवेदन आंबेगाव तहसीलदार व पोलीस प्रशासनास दिले आहे.

या वस्तीसाठी रस्ता जोपर्यंत मोकळा होत नाही तोपर्यंत तहसील कार्यालयासमोर मुक्काम आंदोलन करण्याची भूमिका आदिवासी ठाकर बांधवांनी घेतली आहे. आज (7 जुलै) पासून जनावरांसह मुक्काम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच आणि आदिवासी ठाकर विकास समन्वय समिती या संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय