विधानसभेचे उमेदवार, अपना वतन संघटनेचे सिद्दिक शेख यांचा भाऊसाहेब भोईर यांना जाहीर पाठिंबा (Bhausaheb Bhoir)
भाऊसाहेब भोईर यांचा विजय निश्चित : त्यांच्यासोबत उभे राहण्याचे सर्व समाजांना आवाहन – सिद्दिक शेख
आजपर्यंत मी कधीही जातीपातीचे धर्माचे राजकारण केले नसल्याने लोकांचा मला थेट पाठिंबा – भाऊसाहेब भोईर
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि – १५ – प्रचारामध्ये गेल्या काही दिवसांपासून विविध संस्था संघटनांकडून भाऊसाहेब भोईर यांना पाठिंबा मिळत आहे. सध्या याच चिंचवड विधानसभा मतदार संघातून रिंगणात असलेले प्रतिस्पर्धी सिद्धिक शेख यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना जाहीर पाठिंबा दिला. या प्रसंगी सिद्धिक शेख, भाऊसाहेब भोईर, मा. नगरसेवक अनंत कोऱ्हाळे आणि पदाधिकारी उपस्थित होते. (Bhausaheb Bhoir)
चिंचवड मतदार संघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे चिंचवड विधानसभेचे अधिकृत उमेदवार आणि अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दिक शेख यांनी आज अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना आपला पाठिंबा जाहीर केला. चिंचवड विधानसभेत सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारा उमेदवार नसल्याने सर्व संविधान प्रेमी, लोकशाही प्रेमी जनतेची अडचण झाली होती, महा विकास आघाडीचा उमेदवार आणि भाजपचा उमेदवार यांच्यात वैचारिक दृष्ट्या काहीच फरक नसल्याचे सांगत सिद्दिक शेख यांनी भोईर यांना आपला पाठिंबा जाहीर केला.
ते पुढे म्हणाले की अपना वतन संघटनेच्या माध्यमातून सिद्दिक शेख यांनी मोठे काम उभे केले आहे. बहुजन, अल्पसंख्य व दलीत समाजाच्या हक्काचे प्रश्न घेऊन ते मागील दहा वर्षांपासून लढत आहेत. आपण आज या क्षणापासून भाऊसाहेब भोईर यांच्यासोबत प्रचारात सहभागी होत असून मतदार संघातला प्रत्येक माणूस भाऊसाहेबांकडे घेऊन येत्या २० तारखेला त्यांना भरभरून मतदान करणार असल्याचे शेख यांनी सांगितले. (Bhausaheb Bhoir)
भाऊसाहेब भोईर यांच्या उमेदवारीने चिंचवड मतदार संघात मोठी खळबळ उडाली होती, त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनंत कोऱ्हाळे यांना सोबत घेवून महाविकास आघाडीला मोठे खिंडार पाडले आहे. रिपब्लिकन पक्षाचे दोन गट तसेच तेली, माळी, धनगर, मातंग या समाज घटकांचा उघड पाठिंबा भाऊसाहेबांना आहे. आता सिद्धिक शेख सोबत आल्याने भोईर यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे दिसून येते.
भोईर म्हणाले की “माझ्या कामाचे मूल्यमापन आपल्याला माहीत आहे. गेल्या तीन दशकांपासून मी राजकारणात सक्रिय आहे. या निवडणुकीत मला अनेक संघटनांनी घरी येवून पाठींबा दिला. नोटा पेक्षा भाऊसाहेब भोईर हा मतदारांसाठी उत्तम पर्याय आहे. मी जो निर्धार केला होता तो पूर्णत्वास नेण्यासाठी गेल्या ४ महिन्यापासून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलो आहे. पुरोगामी विचार माझी विचारधारा होती.
मात्र आता मी विकासाची विचारधारा हाती घेतली आहे. जनतेला आता बदल तर हवाच पण त्याचबरोबर परिवर्तन हवे आहे. या निवडणुकीत चिंचवड मतदार संघातून मला मतदार मोठ्या संख्येने मतदान करून विजयी करतील असा माझा ठाम विश्वास आहे.
कोऱ्हाळे म्हणाले की, भाऊसाहेब भोईर हे माझे राजकीय जीवनातील गुरू आहेत. एवढेच नव्हे तर ते माझे मोठे बंधू आहेत. गेल्या एका तपापासून माझ्या पाठीशी ते खंबीरपणे उभे आहेत. वेळोवेळी त्यांनी मला मदत तसेच अनमोल मार्गदर्शन केले आहे आणि करत आहेत.
ते पुढे म्हणाले की मी जरी शिवसेनेचा असलो तरी मी माझा व्यक्तिगत निर्णय घेवून चिंचवडचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. मी चिंचवडचा असल्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबीयांना तसेच चिंचवड वासियांना वाटते की आपल्या चिंचवडचा आमदार झाला पाहिजे. म्हणून मी आज त्यांच्या पाठिंबा खंबीर उभा आहे.