Thursday, September 19, 2024
Homeराज्यराज्यातील २५ हजार शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार - शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

राज्यातील २५ हजार शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार – शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

मुंबई : ‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क’ अधिकार अधिनियमाच्या अनुषंगाने शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.

नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शाळेच्या परिसरातील ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याची खात्री करून शाळापूर्व तयारीच्या काळात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रवेश द्यावा. शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी नजीकच्या दगडखाणी, वीटभट्टी, बाजारपेठा, पदपथ, कामगारवस्त्या अशा ठिकाणी सर्वेक्षण करावे, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिल्या आहेत.

मागील काही कालावधीत कोविडमुळे शाळा अनेक दिवस बंद होत्या. या काळात स्थलांतराचे प्रमाणही अधिक होते. त्यामुळे प्रत्यक्षात शाळेत दाखल मुले व शाळाबाह्य मुले यांचा शोध घेण्याची आवश्यकता अधिक भासू लागली. यासाठी शाळाबाह्य, स्थलांतरित, अनियमित मुलांच्या नोंदणी व शिक्षणासाठी शालेय शिक्षण विभाग व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बालरक्षक’ ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. यासंदर्भातील कार्यवाही शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मागील वर्षी राज्यात कधीच शाळेत न गेलेल्या ६ ते १४ वयोगटातील बालकांची संख्या ७८०६ होती, ज्यामध्ये ४०७६ मुले आणि ३७३० मुलींचा समावेश होता. तर अनियमित उपस्थितीमुळे शाळाबाह्य झालेल्या बालकांची संख्या १७ हजार ३९७ होती. यामध्ये ९००८ मुले तर ८३८९ इतक्या मुली आहेत. दोन्ही मिळून ही संख्या २५ हजार २०४ इतकी आहे. यापैकी विशेष गरजाधिष्ठित असलेल्या बालकांची संख्या १२१२, बालकामगार म्हणून काम करीत असलेल्या बालकांची संख्या २८८ तर अन्य कारणांमुळे शाळाबाह्य होणाऱ्या बालकांची संख्या २३ हजार ७०४ इतकी आहे.

शाळाबाह्य बालकांना शाळेत दाखल करणे तसेच कोविड मुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे झालेले अध्ययन नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. याचबरोबर समग्र शिक्षा अंतर्गत शाळाबाह्य बालकांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे. यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘विद्यार्थी मित्र’ या पूरक शैक्षणिक साहित्याची निर्मिती करण्यात आली असून वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेशित विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी ‘शिक्षक मार्गदर्शिका’ या पूरक शैक्षणिक साहित्याची निर्मिती करण्यात आली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३मध्ये शाळेत दाखल होणाऱ्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी अध्ययन सहाय्य म्हणून विषयनिहाय व्हिडीओ निर्मिती करण्याचे नियोजन आहे. तर शाळाबाह्य मुलांचा शोध व त्यांना मुख्य प्रवाहात दाखल करण्यासाठी बालरक्षकांना प्रशिक्षित करण्यात येणार असल्याचेही प्रा.गायकवाड यांनी सांगितले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय