Saturday, April 20, 2024
Homeसंपादकीय४१℃ : पिंपरी चिंचवड, पुणे सह विविध शहरे का तापत आहेत ?

४१℃ : पिंपरी चिंचवड, पुणे सह विविध शहरे का तापत आहेत ?

२० वर्षांत जागतिक पातळीवर पृथ्वीचे तापमान १.५ अंशापर्यंत वाढेल. हे तापमान २०५० पर्यंत अनाकलनीय वाढेल असा अंदाज आधी शास्त्रज्ञांचा होता. मात्र, जगात वेगाने होणारी बांधकामे आणि वृक्षतोडीमुळे हे १० वर्षे आधीच म्हणजे २०४० पर्यंत वाढेल. संयुक्त राष्ट्राच्या इंटरगव्हर्नल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) च्या अहवालात दोन वर्षांपूर्वी इशारा देण्यात आला होता. नागरी वसाहतीची बेलगाम वाढ, वाहनांची वाढती संख्या, प्रशस्त रस्त्यांचे काँक्रिटिकरण, बेलगाम वृक्षतोड, वायू प्रदूषणाचा चढता आलेख, गटार झालेल्या नद्या, निसर्ग विसंगत जीवनशैली यामुळे मोठ्या शहरांची घुसमट झालेली आहे.

देशातील आल्हाददायक हवामान असलेल्या पिंपरी चिंचवड, पुणे ही शहरे उष्णतेच्या लाटेने भाजून निघत आहेत. मागील सात दिवसापासून ३७ अंशावरून तापमान ४१ अंश इतके वेगाने वाढले आहे. जागतिक हवामान बदलाबाबत असे म्हटले जाते की, कार्बन डाय ऑक्साईडच्या उत्सर्जनाने तापमान निसर्ग नियंत्रणाबाहेर जाते. त्यामुळे युरोपातील राष्ट्रांनी पेट्रोल, डिझेलवर चालणारी वाहने कमी केली आहेत. त्या देशात युरो ६ मानके कठोरपणे पाळली जातात.

देशाच्या व महाराष्ट्राच्या औद्योगिक शहरात सार्वजनिक वाहतूक सेवा कोसळली आहे, त्यामुळे नाईलाजाने वाहने घेतल्याशिवाय नोकरी, व्यवसाय करता येत नाहीत. पुणे पिंपरी चिंचवड शहरातील वाहनांची आकडेवारी नेत्रदीपक प्रगतीचे चित्र असले तरी समृद्ध शहरातील कार्बन फुटप्रिंट धोकादायक आहेत. ३१ जुलै २०१७ अखेरपर्यंत ३४ लाख ३० हजार ६३५ इतक्या वाहनांची नोंद झाली आहे. तर, पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात १६ लाख १६ हजार ३०४ वाहनांची नोंद आहे. यामध्ये दुचाकींची संख्या ३७ लाख ७१ हजार ८९९ एवढी आहे. कारची संख्या आठ लाख ७२ हजार १२२ इतकी आहे. याचाच अर्थ एकूण वाहन संख्येच्या ७५ टक्के दुचाकी आहेत. दरवर्षी एक लाख वाहने पुणे पिंपरी चिंचवड शहरात रस्त्यावर येतात. या दोन्ही शहरांची वाहन संख्या ५० लाखाच्या पुढे गेली आहे.

भारत स्टेज( BS-6) नुसार नवी वाहने वापरात आल्यानंतर ८० टक्के वायुप्रदूषण कमी होईल, हे कागदावर राहिले आहे. वाहन उद्योगातील (कार,दुचाकी) कंपन्यांना ही औद्योगिक शहरे म्हणजे मोठे मार्केट आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे सरकारचे दुर्लक्ष या उद्योगाच्या धंद्यासाठी होत आहे, असे वास्तविक चित्र आहे. भंगारात जावी अशी वाहने आजही पिंपरी चिंचवड, पुणे शहरातील रस्त्यावर फिरत आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील बिल बोर्ड (वायु गुणवत्ता दर्शक फलक) बसवले पण पांढरे शुभ्र बिलबोर्ड काही आठवड्यात काळे पडले यावरून शहरातील हवेत कार्बन डाय ऑक्साइड प्रमाणाच्या बाहेर आहे हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येथील निसर्गाची वायू संतुलन व्यवस्था समतोल राखू शकत नाही आणि उष्मांक वेगाने वाढत आहे.

जल, जंगल, जमीन यावर अतिक्रमणे वाढत आहेत, तसे तापमान मागील दोन दशकात ३२ अंश वरून ४१ अंश इतके वाढले आहे. यावर्षी ढगाळ हवामान, नष्ट झालेल्या वाऱ्याच्या झुळकी यामुळे पिंपरी चिंचवड शहर उष्णतेची भट्टी झाले आहे. वृक्ष संवर्धनाच्या नावाखाली विदेशी झाडांमुळे शहरातील आपली जैविक विविधता कमी होऊ लागली आहे. पिंपळ, वड, कडूनिंब ही झाडे वातावरणातील कार्बन-डायऑक्साइड ग्रहण करण्याचे काम करतात. टक्केवारीत विचार केला तर पिंपळ १०० टक्के, वड ८० टक्के आणि कडूनिंब ७५ टक्के कार्बन-डायऑक्साइड शोषून घेतो आणि ही झाडे पूर्वी शहर परिसराला थंड ठेवत होती. १९९० नंतर रास्ते विकासाच्या नावाखाली ही सर्व झाडे तोडण्यात आली. त्यामुळे पिंपरी चिंचवड, पुणे शहरातील सर्व महामार्ग ओके बोके झाले आहेत.

कावळे, चिमणी, साळुंकी, कोकिळा, कबुतर यासारखे पक्षी बसत नाहीत आणि त्या झाडावर घरटी करत नाहीत, अशी परदेशी झाडे लावून शहरामध्ये वृक्षसंवर्धनाचे कार्यक्रम राबवण्यात आले. त्यामुळे शहरातील पूर्वीचे निसर्ग नियंत्रित चक्र थांबले आहे. राजस्थानच्या वाळवंटातही सुसह्य उन्हाळा असतो, कदाचित उष्माघाताचे प्रमाण आद्यपही कमी आहे, मात्र तापमान वाढीचा आलेख पुढील काळात ४५ अंश इतका वाढला तर पिंपरी चिंचवड, पुणे शहरातील जनजीवन प्रचंड प्रभावित होण्याचा धोका आहे.

संपादन – क्रांतीकुमार कडूलकर

हे ही वाचा :

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस, वाचा काय आहे प्रकरण

पीक कर्जासाठी ‘सिबिल स्कोअर’ मागणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

सर्पदंश झाल्यास नागरिकांना वेळेत औषधोपचार घेण्याचे डॉ. सदानंद राऊत यांचे आवाहन

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय