पिंपरी चिंचवड : मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे आणि सतत वाढणाऱ्या वाहनांमुळे पुणे-मुंबई रस्त्यावरील पिंपरी, कासारवाडी, दापोडीमध्ये वाहतुकीची कोंडी होते. मुंबई – पुणे हा शहरातील वर्दळीचा हायवे आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य असलेल्या पिंपरी चौकात वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. पुणे-मुंबई महामार्ग, महापालिका मुख्यालय, रेल्वे स्थानक, भाजी मंडई, बाजारपेठ अशा प्रमुख ठिकाणी व्यापार उदीम यामुळे सतत वर्दळ असते.
“पुण्याला जाताना कामाला जाताना ट्रॅफिक जॅम होऊन वीस वीस मिनिटे थांबावे लागते. याठिकाणी अवजड ट्रक, बसेस, रिक्षा, मोटर सायकल अरुंद रस्त्यामुळे कोंडी वाढते. मेट्रोचे काम रात्री करावे, मेट्रोमुळे ही कोंडी जास्त वाढतेय.”
– गणेश मराठे, चिखली प्राधिकरण
येथील फिनोलेक्स कंपनी समोरील चौक ते आंबेडकर चौक येथे महामेट्रोचे काम सुरू आहे. मनपा भवनासमोरील सहापदरी रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. महानगर परिवहन सेवा (PMPL) कार्यक्षम करण्यात दोन्ही महापालिकांना अपयश आले आहे. त्यामुळे खाजगी वाहनांची संख्या वाढत आहे, असेही नागरिक म्हणत आहेत.
“महामेट्रोचे काम संथगतीने सुरू आहे. फिनॉलेक्स, आंबेडकर चौक हे शहरातील अतिशय वर्दळीची ठिकाणे आहेत. याचा विचार करून मेट्रोने तातडीने कामे पूर्ण करावीत.”
– विनायक पारखी, चिंचवडगाव
हा जुना पुणे-मुंबई महामार्ग अतिशय वर्दळीचा आहे. तसेच पिंपरी मुख्य भाजी मंडई, पिंपरी मुख्य बाजारपेठ, पिंपरी रेल्वे स्थानकाकडे जाणारे मार्ग या चौकातून जातात. महापालिका मुख्यालय या चौकाजवळ नोकरदार मंडळींच्या मोटर्स, पी एम पी एल बसेस आणि इतर खाजगी वाहन यामुळे वाहतूक कोंडी होते. दोन्ही चौकातील सिग्नल यंत्रणा वाहनाच्या गर्दीमुळे अपुरी पडत आहे. शहरातील या वाहतूक कोंडीपासून कायमची सुटका करण्यासाठी दोन्ही चौकात विशेष उपाययोजना करण्याची गरज आहे.
– क्रांतिकुमार कडुलकर